अमृतसर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्यामध्ये पंजाबचे चार जवान होते. या जवानांवर त्यांच्या गावी आज अंत्यसंस्कार करण्यात आले. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यानी पंजाबचे सांस्कृतिक मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांनी चार शहीद जवानांपैकी एका जवानाच्या अंत्यसंस्काराला हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु सिद्धू यांनी मुख्यमंत्र्यांचे आदेश धुडकावत अंत्यसंस्काराला दांडी मारली.

पुलवामामधील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पंजाबच्या चार जवानांची पार्थिवं आज त्यांच्या मूळ गावी आणण्यात आली. तिथे त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सिद्धू यांना शहीद जवान जयमल सिंह यांच्या अंत्यसंस्काराला हजर रहाण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात पोलिसांनाही कळवण्यात आलं होतं. तरीही सिद्धू या अंत्यसंस्काराला गेले नाहीत.

सिद्धू यांच्या अशा वागण्यामुळे पंजाबच्या कॅबिनेटमधील मंत्री त्यांच्यावर नाराज आहेत. सिद्धू यांची पंजाबच्या कॅबिनेटमधून हकालपट्टी करा अशी मागणी आता होऊ लागली आहे. या घटनेमुळे #SackSidhuFromPunjabCabinet असा एक हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

VIDEO | पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतरचं वक्तव्यानंतर काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धूंशी खास बातचीत | एबीपी माझा



दरम्यान, पुलवामा हल्ल्याबाबत सिद्धू सातत्याने मवाळ भूमिका घेत आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त करायला हवा, अशी मागणी देशभर होत असताना सिद्धू यांनी मात्र पाकिस्तानशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला पाहिजे असं म्हणत आहेत. त्यामुळे सिद्धू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होऊ लागले. त्यानंतर सिद्धू यांची 'दी कपिल शर्मा शो' या टीव्हीवरील कार्यक्रमामधून हकालपट्टी करण्यात आली.

कपिल शर्माच्या शोमधून हकालपट्टी झाली तरीदेखील सिद्धू म्हणाले की, "मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. काही ठरावीक लोकांमुळे संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार धरु नये."

वाचा  : 'द कपिल शर्मा शो'मधून सिद्धू यांना हटवलं, पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया भोवली