Himachal Pradesh Weather Update: हिमाचल प्रदेशात अवघ्या दोन आठवड्यात मान्सूनने प्रचंड उद्ध्वस्त केले आहे. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. ढगफुटीनंतर अचानक आलेल्या पुरामुळे झालेल्या मोठ्या विध्वंसातून हिमाचल प्रदेश सावरू शकलेले नाही. दरम्यान, हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टमुळे लोक घाबरले आहेत. हवामान खात्याने 6 जुलै दुपारी ते 7 जुलै दरम्यान मंडी, कांगडा, सिरमौर येथे मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट आपत्तीग्रस्त लोकांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखा आहे.
हवामान खात्याने चंबा, कांगडा, मंडी आणि सिरमौर येथेही अचानक आलेल्या पुराचा अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने 8 जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सरकारी प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
हिमाचलमध्ये पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान
हिमाचलमध्ये मान्सूनमुळे आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू झाला आहे. 113 जण जखमी झाले आहेत तर 37 जण अजूनही बेपत्ता आहेत. मुख्यमंत्री राज्यात 700 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करत असले तरी, आपत्ती व्यवस्थापनाने 541 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आकडा दिला आहे. राज्यात 261 रस्ते बंद आहेत. 300 ट्रान्सफॉर्मर बंद आहेत. 281 पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. 521 प्राणी आणि पक्षी वाहून गेले आहेत, 19 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, 82 घरांचे नुकसान झाले आहे, 205 जनावरांचे गोठे वाहून गेले आहेत.
पावसामुळे मंडीमध्ये अधिक नुकसान
मंडीमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे जिथे 15 जणांचा मृत्यू झाला आहे, अनेक लोकांचा शोध सुरू आहे. मंडीमध्ये 176 रस्ते बंद आहेत. कुल्लूमध्ये 39, सिरमौरमध्ये 19, कांगडामध्ये 120 आणि शिमलामध्ये 6 रस्ते बंद आहेत. मंडीच्या सेराजमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी सैन्याला मैदानात उतरावे लागले.
दरम्यान, झारखंडमध्ये शनिवारी मुसळधार पाऊस पडला. रामगड जिल्ह्यातील महुआ टांगरी येथे सकाळी एक बेकायदेशीर कोळसा खाण कोसळली. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झाले. सोमवार सकाळपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. मध्य प्रदेशात जोरदार पावसाची यंत्रणा सक्रिय असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे मंडला जिल्ह्यात नर्मदा नदीला पूर आला आहे. येथे, नरसिंहपूर ते होशंगाबादला जोडणारा राष्ट्रीय महामार्गावरील पूल कोसळला.आज बिहारमधील 18 जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट आहे. या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. जोरदार वारेही वाहू शकतात. शनिवारी मुंगेरच्या अररिया येथे पाऊस पडला. सासाराममध्ये वीज पडून दोन महिलांचा मृत्यू झाला. तर एका महिलेला जबर दुखापत झाली.
इतर महत्वाच्या बातम्या