PM Modi Gujrat Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर (Gujrat Visit) आहेत. आज पंतप्रधान मोदी सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटी (Statue Of Unity) येथे राष्ट्रीय एकता दिन (National Unity Day) सोहळ्यात सहभागी होतील. लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान मोदी केवाडिया येथे स्टॅच्यू ऑफ यूनिटीला भेट देत अभिवादन करतील आणि पुष्पांजली अर्पण करतील.
पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर
पंतप्रधान मोदी आज सकाळी 8 वाजता केवाडिया येथे दाखल होतील. यानंतर ते लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहतील.पंतप्रधान राष्ट्रीय एकता समारंभाला हजेरी लावतील. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी मेरा युवा भारत संघटनेचा शुभारंभ करतील. पंतप्रधानांच्या हस्ते आज केवाडियामध्ये विविध प्रकल्प आणि योजनांचा शुभारंभ आणि भूमीपूजन पार पडणार आहे.
सरदार वल्लभ पटेल यांना श्रद्धांजली वाहणार
पंतप्रधान मोदी राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन सरदार वल्लभ पटेल यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात सीमा सुरक्षा दल (BSF) आणि राज्य पोलिसांच्या अनेक तुकड्यांची परेड पार पडेल. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) च्या ऑल महिला बाईकर्स डेअरडेव्हिल शो परेडचं मुख्य आकर्षण आहे. याशिवाय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) महिला पाईप बँड, गुजरात महिला पोलिसांचे नृत्य, विशेष एनसीसी शो, स्कूल बँड यासह इतर आकर्षणांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये भारतीय वायुसेनेचा फ्लाय पास्ट, व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमांतर्गत गावांचा आर्थिक दृष्टीकोन प्रदर्शित करण्यात आला.
विविध प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी
केवडियामध्ये पंतप्रधान 160 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये एकता नगर ते अहमदाबाद ही हेरिटेज ट्रेन, नर्मदा आरती लाईव्ह प्रकल्प, कमलम पार्क, स्टॅच्यू ऑफ युनिटी कॉम्प्लेक्समध्ये एक पदपथ, 30 नवीन ई-बस, 210 ई-सायकल आणि अनेक गोल्फ कार्ट, एकता नगर यांचा समावेश आहे. शहर गॅस वितरण नेटवर्क आणि गुजरात राज्य सहकारी बँकेच्या 'सहकार भवन'शी संबंधित प्रकल्पांचीही पायाभरणी करण्यात येणार आहे. याशिवाय केवडिया येथे सोलर पॅनलसह ट्रॉमा सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजनही पंतप्रधान करणार आहेत.