National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज ईडीसमोर (ED) आपला जबाब नोंदवणार आहेत. या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांना ईडीनं पाठवलेल्या समन्स विरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीत मोर्चा काढणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर एक पोस्टर लावले आहे. हे पोस्टर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर 'सत्य झुकेगा नही'! असं लिहलं आहे.
काँग्रेसचा भाजपवर निशाणा
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राहुल गांधी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर होण्याच्या आधी, काँग्रेसनं रविवारी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर (भाजप) सूडाच्या राजकारणाचा आरोप केला. आज 'नॅशनल हेराल्ड-असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड' डीलशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राहुल गांधी ईडीसमोर हजर होणार आहेत. अशा परिस्थितीत पक्षाचे सर्व प्रमुख नेते आणि खासदार दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयावर निषेध मोर्चा काढून 'सत्याग्रह' करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. राज्यातील काँग्रेस नेतेही सोमवारी तपास यंत्रणेच्या कार्यालयांवर मोर्चा काढून 'सत्याग्रह' करणार आहेत.
ईडीने पाठवलेले समन्स निराधार : पी. चिदंबरम
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मनी लाँड्रिंग प्रकरणी राहुल गांधींना ईडीने पाठवलेले समन्स 'निराधार' आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते केले जातील, असे चिदंबरम म्हणाले.
सोनिया गांधी हजर राहणार नाहीत
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांना यापूर्वी दोन जून रोजी चौकशीसाठी बोलावलं होतं. पण ते विदेश दौऱ्यावर असल्यामुळं त्यांनी ईडीकडं वेळ वाढवून मागितली होती. त्यानंतर ईडीनं त्यांना 13 जूनला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. दुसरीकडे, सोनिया गांधी यांनाही ईडीनं नोटीस बजावली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईडीसमोर उपस्थित राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. कारण त्यांना कोरोनाची लागण झाली असून अद्याप त्या कोरोनामुक्त झाल्या नाहीत.
महत्वाच्या बातम्या: