भोपाळ : पुलवामा हल्ल्याच्या 64 दिवसांनंतर या हल्ल्यामागचा सुत्रधार असलेल्या मसूद अजहरला वाचवणारी चीनची भिंत ढासळलेली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. या घटनेनंतर देशात विरोधकांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याप्रकरणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे नरेंद्र मोदींचे मित्र आहेत. त्यामुळे आता मोदींच्या या मित्राने दाऊद इब्राहिम, मसूद अजहर आणि हफीज सईदला त्वरीत भारताच्या ताब्यात द्यायला हवं.


दिग्विजय सिंह म्हणाले की, घोषणा करुन काय होणार आहे? पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मोदींसोबतची दोस्ती निभावण्यासाठी दाऊद इब्राहिम, मसूद अजहर आणि हफिज सईदला त्वरीत भारताकडे सोपवायला हवं.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ याबाबत म्हणाले की, मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे, हे चांगलंच झालं. परंतु हे खूप अगोदर व्हायला हवं होतं. खूप दिवसांपासून हे ठरलं होतं. अखेर भारतात निवडणुकीच्या दरम्यान हे काम झालं. या घटनेचा निवडणुकीशी काही संबंध आहे की नाही हे मात्र मला माहीत नाही.

काल (बुधवार, 1 मे ) संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत मसूद अझहरचा समावेश केला. पुलवाला हल्ला आणि भारतविरोधी अनेक कारवायांमध्ये मसूद अझहरची महत्त्वाची भूमिका आहे. मसूद अझहरला चीनचं नेहमीच समर्थन मिळत होतं, मात्र यावेळी चीनने नरमाईची भूमिका घेतली.