नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यात फोनवरुन चर्चा झाली आहे. या चर्चेसंदर्भातील माहिती नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका सर्वसमावेशक प्रादेशिक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला. सर्व क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य सातत्याने मजबूत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. भारत आणि अमेरिका एकत्रितपणे जागतिक शांतता, स्थैर्य आणि संपन्नतेसाठी कार्य करत राहतील, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
भारत आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींचं शिष्टमंडळ नवी दिल्लीत व्यापार कराराला अंतिम स्वरुप देण्यासंदर्भात चर्चा करत आहेत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाली. ट्रम्प यांची अलीकडच्या काळातील वक्तव्य पाहिली तर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी कराराला अंतिम स्वरुप मिळेल, असं संकेत मिळत आहेत.
अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जैमिसन ग्रीर यांनी भारतानं अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात चांगला प्रस्ताव दिला आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये सिनेटच्या एका उपसमितीच्या बैठकीत त्यांनी म्हटलं की अमेरिकेन व्यापार पथक सध्या भारतात आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित अडचणींबाबत चर्चा करत आहे.
भारताच्या प्रस्तावाबाबत अमेरिकेकडून स्वागत
भारत मात्र कृषी आणि डेअरी क्षेत्र अमेरिकेसाठी खुलं करण्यास तयार नाही. भारतातील कोट्यवधि लोकांचा उदरनिर्वाह दूग्ध व्यवसायावर चालतो. जैमिसन ग्रीर यांनी भारताच्या भूमिकेबद्दल बोलताना म्हटलं की भारताची भूमिका आता पुढे येत आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी (11 डिसेंबर) म्हटलं की जर अमेरिका व्यापार कराराबद्दल भारतानं दिलेल्या प्रस्तावावर खुश असेल तर मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली पाहिजे. त्यांनी भारतानं दिलेल्या प्रस्तावाबाबत ट्रम्प प्रशासनानं जी प्रतिक्रिया दिली त्याचं स्वागत केलं. अमेरिकेनं व्यापार कराराबाबत भारताच्या प्रस्तावाबाबत घेतलेल्या भूमिकेचं पीयूष गोयल यांनी स्वागत केलं.
दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराबाबत चर्चेच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार कधी अंतिम होणार हे निश्चित सांगण्यात आलं नाही.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेलं 50 टक्के टॅरिफ व्यापार करार झाल्यानंतर किती कमी होणार ते पाहावं लागेल. भारतावर अमेरिकेनं 25 टक्के टॅरिफ लादलं तर याशिवाय रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं आहे.