नवी दिल्ली : सैन्यदलाच्या क्षमतेवर आपल्याला पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे त्यांनी टार्गेट निवडावे आणि कारवाई करावी असा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिल्याची माहिती आहे. पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Terrorist Attack) आपल्याला बदला घ्यायचा आहे, दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर द्या असंही पंतप्रधानांनी सैन्याच्या तीनही दलांना सांगितलं आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर शत्रूला धडा शिकवण्यासाठी भारतानं रणनीती आखायला सुरूवात केली असून त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, सीडीएस अनिल चौहान, आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते.  याशिवाय एनएसजी, बीएसएफ, सीआरपीएफ आणि सशस्त्र सीमा दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीमुळे भारताकडून काहीतरी मोठं पाऊल उचललं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

काश्मीरमध्ये मोठी कारवाई सुरू

हल्ला झालेल्या पहलगामसोबतच काश्मीरच्या विविध भागात दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्याने मोठी मोहीम उघडली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्यानुसार, काश्मीरच्या विविध भागात ऑपरेशन्स राबवण्यात येत आहेत. मात्र या लष्करी कारवाईबाबत, अजून अधिकृत वृत्त समोर आलेलं नाही. पण काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. 

भारत काहीतरी मोठं करणार, मोदींचे संकेत 

आपल्याकडे वेळ कमी आहे आणि लक्ष्य मोठं आहे असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. दिल्लीतल्या तरुणांच्या एका परिषदेत बोलताना केलेल्या या वक्तव्याकडे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाहण्यात येत आहे. हे वक्तव्य केल्यानंतर मोदींनी थोडा पॉज घेऊन हे मत सध्याच्या स्थितीसाठी नसल्याचंही सांगितलं. पण पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत मोठं पाऊल उचलून जगाला धक्का देऊ शकतो, अशी अटकळ बांधण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी या वक्तव्यातून काही मोठ्या घडामोडींचे संकेत दिलेत का, अशी चर्चा सुरू आहे. 

भारताचा डिप्लोमॅटिक स्ट्राईक 

सिंधू पाणी वाटप करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तान गडबडला असून अस्वस्थ झाल्याचं दिसतंय. तशातच आता बिथरलेल्या पाकिस्तानकडून थेट युद्धाची भाषा सुरु झाली आहे. भारताकडून संभाव्य हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानला धडकी भरली आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगीट, बाल्टिस्तान भागात पाकिस्तानी वायुदलाने, ललकार-ए-मोमिन नावाने युद्धसराव सुरू केला.. या युद्धाभ्यासात चीनी बनावटीचं जे 10, जेएफ 17  आणि अमेरिका बनावटीचे एफ 16 फायटर जेट्स सहभागी झालेत.

एक दहशतवादी पाकिस्तानी सैन्यातील कमांडो

पहलगाम हल्ल्यानंतरच्या तपासात पाकिस्तानचा बुरखा फाटला असून पर्यटकांवर गोळ्या झाडणाऱ्यांपैकी एक, हाशिम मुसा नावाचा दहशतवादी पाकिस्तानी सैन्यातील पॅरा कमांडो असल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्समधल्या कमांडो मुसाने लष्कर ए तोयबा जॉईन केल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांना ट्रेनिंग, हत्यारं पुरवण्यात मुसाचा सहभाग होता. एवढचं नाही तर दीड वर्षांपूर्वी पूंछ, राजौरीतही याच दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचा संशय आहे. लष्करमधल्या मास्टरमाईडनेच हाशिमला पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी काश्मीरला पाठवले होते. पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपने त्याला दहशतवादी हल्ल्यासाठी काही दिवसांसाठी लष्कर-ए-तोयबाकडे सोपवल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे.