राहुल गांधी दीर्घायुषी व्हा! नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2018 09:29 AM (IST)
या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल गांधींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 48 वा वाढदिवस आहे. काँग्रेस कार्यकर्ते संपूर्ण देशभरात आपल्या नेत्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याच्या तयारीत आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल गांधींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मी त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो, अशा शुभेच्छा मोदींनी ट्विटरद्वारे दिल्या आहेत. राजकीय शैलीत बदल 19 जून 1970 रोजी जन्मलेले राहुल गांधी यांनी 2004 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला. सध्या ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असून मागील काही दिवसांमध्ये त्यांनी आपल्या राजकीय शैलीत बराच बदल केला आहे. राहुल गांधी आता आक्रमक भूमिकेत दिसतात. इतकंच काय तर ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करतात. तसंच सोशल मीडियाद्वारे ते मोदींवर वार करायला विसरत नाहीत. अध्यक्ष बनल्यानंतर पक्षाला उभारी सुमारे 14 वर्षांपूर्वी राजकारणाची सुरुवात करण्यापासून काँग्रेस अध्यक्ष बनण्यापर्यंत राहुल गांधींमध्ये फार बदल झाले आहेत. त्यांच्या राजकारणाची पद्धतही बदलली आहे. मागील वर्षी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी गुजरात आणि कर्नाटक निवडणूक ज्या पद्धतीने लढवली, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना नवी उभारी मिळाली. गुजरातमध्ये पक्षाला विजय मिळाला नसला तरी कर्नाटकमध्ये भाजपला अखेर त्यांनी मात दिली.