Narendra Giri Death : आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Narendra Giri) यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या अल्लापूर या येथील बाघंबरी या ठिकाणच्या निवासस्थानी हा मृतदेह सापडला असून पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. त्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी (Anand Giri) याला अटक केली आहे. महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या हा वाद सुरु असताना आखाडा परिषदेतील संपत्तीचा वाद समोर आल्याने या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. 


महंत नरेंद्र गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये शिष्य आनंद गिरी हा आपल्याला त्रास देत असल्याचं सांगितलं आहे. तसेच या नोटमध्ये आपला वारस कोण असावा, मठ आणि आश्रममध्ये भविष्यात कशा प्रकारचे काम करण्यात यावं, कशा प्रकारची व्यवस्था असावी या सगळ्याची माहिती दिली आहे. महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट ही एक प्रकारचे मृत्यूपत्रच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 


आनंद गिरीचा आरोप
महंत नरेंद्र गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये यापुढे मठाची जबाबदारी कोणाकडे देण्यात यावी हे सविस्तरपणे लिहलं आहे. त्यामध्ये शिष्य आनंद आपल्याला त्रास देत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. त्या आधारे पोलिसांनी आनंद गिरीला अटक केली आहे. पण त्या आधीच आनंद गिरीने माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की, महंत नरेंद्र गिरी यांची ही आत्महत्या नसून ती हत्या आहे. यामध्ये कुणाचा सहभाग आहे याचा खुलासा पोलिसांनी करावा असंही त्यांनी म्हटलं होतं. जर या प्रकरणात आपण दोषी सापडलो तर आपल्याला कायद्याप्रमाणे शिक्षा देण्यात यावी असं आनंद गिरी यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. 


महंत नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांच्यात वाद
या आधी महंत नरेंद्र गिरी आणि त्यांचा शिष्य आनंद यांच्यात या आधी एकदा वाद झाला होता. या वादाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यानंतर आनंद गिरीने महंत नरेंद्र गिरी यांची माफी मागितली आणि या प्रकरणावर पडदा टाकला. 


पोस्टमार्टमच्या अहवालाकडे लक्ष
महंत नरेंद्र गिरी यांच्या मृतदेहाचे पोर्टमार्टम करण्यात आलं असून त्याच्या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागूलं आहे. या अहवालावरुन महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या याचा खुलासा होणार आहे.