कोलकाता : मुंबईत राहणाऱ्या महिलेने एका आयएएस अधिकाऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. ही महिला सध्या आर्थिक मंत्रालयात कार्यरत आहे. तर आयएएस अधिकारी कोलकातामध्ये तैनात आहे. "अधिकाऱ्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर फसवणूक केली आणि त्यानंतर मला सोडलं," असा आरोप महिलेने केला आहे.


या महिलेने मंगळवारी सॉल्ट लेकच्या महिला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केला आहे. तक्रारीच्या आधारावर, पोलिसांनी सॉल्ट लेक कोर्टाकडून न्यायालयीन जबाब नोंदवण्याची परवानगी मागितली आहे. न्यायालयाच्या आदेशावर महिलेने बुधवारी कलम 164 सीआरपीसी अंतर्गत दंडाधिकाऱ्यांसमोर आपला जबाब नोंदवला.

फेसबुकवर मैत्री
महिलेच्या तक्रारीनुसार, "आयएएस अधिकाऱ्यासोबत तिची फेसबुकवर मैत्री झाली होती. सुरुवातीला सोशल मीडियावर त्यांचं चॅटिंग सुरु होतं. त्यानंतर ते फोनवर बोलू लागले. लवकरच ते एकमेकांच्या अधिक जवळ आले."

यादरम्यान महिला त्या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी कोलकातालाही गेली होती. "कोलकाता भेटीवेळीच आयएएस अधिकारी तिला केबी ब्लॉक अपार्टमेंटमध्ये घेऊन गेला. यावेळी तिच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिक्स केलं होतं आणि त्याने परिस्थितीचा फायदा घेतला," असंही तिने सांगितलं.

टाळायला सुरुवात केल्याने तक्रार
"मला त्या आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध ठेवायचे होते, त्यामुळे तेव्हा तक्रार केली नाही," असं महिलेने सांगितलं. "पण आपल्याबाबत अधिकाऱ्याचे वेगळेच विचार होते. अधिकाऱ्याने महिलेला टाळायला सुरुवात केली. तसंच आपला कॉलही रिसिव्ह करत नसे. अधिकाऱ्याच्या या वर्तणुकीनंतर आपलं लैंगिक शोषण झाल्याचं समजल्यानंतर औपचारिक तक्रार दाखल केली," असा दावा महिलेने केला आहे.

प्रकरणाचा तपास सुरु
लवकरच आरोपी अधिकाऱ्याची चौकशी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, "त्या व्यक्तीची चौकशी केली जाईल. या प्रकरणात आधीच तक्रार दाखल केली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरु आहे."

"तक्रारीत केलेल्या आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी फेसबुकवर झालेल्या बातचीतद्वारेही माहिती गोळा केली जात आहे," असंही पोलिसांनी सांगितलं.