मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर सर्वच राजकीय पक्षांकडून केला जातो. आता तशीच स्थिती शेजारील राज्य मध्य प्रदेशातही निर्माण होत आहे. 22 सप्टेंबर रोजी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) आणि त्यांचे खासदार पुत्र नकुलनाथ हे छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे (Chh. Shivaji Maharaj Statue In MP) अनावरण करणार आहेत. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना बोलावण्यात आल्याची माहिती आहे.


काँग्रेस नेते कमलनाथ यांनी या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर भाजपने चांगलीच टीका सुरू केली आहे. कमलनाथ हे मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण होऊ नये यासाठी त्यांनी तो हटवला होता. आता त्यांनीच पुन्हा पुतळा उभा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 


महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण सुरू? (Chhatrapati Shivaji Maharaj Statue In MP)


कमलनाथ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशी संबंधित जुना वाद लक्षात घेता मध्यप्रदेशासह महाराष्ट्रात ही राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणी काँग्रेस आणि ठाकरे गटाने भाजपवर महापुरुषांच्या नावावर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. तर भाजप ने कमलनाथ ज्यांनी मुख्यमंत्री असताना छत्रपतींचा हटवला होता, त्यांच्या व्यासपीठावर आदित्य ठाकरे कसे जाणार असा सवाल भाजपने विचारला आहे.


एकंदरीत आता महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नावावर होणारे राजकारण आता येत्या काळात मध्य प्रदेशातही होणार असल्याचं दिसून येतंय.