बेहराईच (उत्तरप्रेदश): मोगलीप्रमाणे जंगलातच वाढलेल्या एका मुलीचा शोध उत्तर प्रदेशातल्या बेहराईचमध्ये लागलेला आहे. दोन महिन्यांपूर्वी कर्तनिया घाटातल्या जंगलात पेट्रोलिंग करत असताना स्थानिक पोलिसांना एक माकडाची टोळी दिसली. त्याच टोळीमध्ये एक 10 वर्षांची मुलगी पोलिसांना आढळली.


ही मुलगी माकडांप्रमाणे चार पायांवर चालत होती. त्यांच्यासोबतच खेळत होती. झाडांवरून उड्या मारत होती. मांकडांसारखेच हावभाव करत होती. तेव्हा तिच्या अंगावर कपडेही नव्हते.

जंगलात पेट्रोलिंग सुरु असताना पोलिसांना माकडांच्या दुसऱ्या एका टोळीसोबत पहिल्या टोळीचं भांडण दिसलं. त्या भांडणात ती मुलगी जखमी झाली आणि बेशुद्ध पडली. पोलिसांनी हवेत गोळीबार करुन माकडांना पांगवलं. माकडांनी तातडीनं झाडांवर धाव घेतली. पण ती मुलगी पोलिसांच्या हाती लागली. पोलीस त्या मुलीला घेऊन जात असताना माकडांच्या टोळीनं पोलिसांच्या गाडीचाही पाठलाग केला.

बेशुद्धावस्थेत असलेल्या मुलीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. पण शुद्धीवर आल्यावर त्या मुलीने आकांडतांडव सुरु केला. माकडांसारखे आवाज काढून, ती ओरडू लागली. खाण्याची ताटं भिरकावून पडलेलं अन्न खाऊ लागली.

गेल्या दोन महिन्यातल्या उपचारानंतर त्या मुलीमध्ये आता सुधारणा होऊ लागल्या आहेत... ती आता पूर्वीसारखी माणसांना पाहून घाबरत नाही, किंचाळत नाही. अद्यापही तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती पूर्ण बरी झाल्यानंतर तिला एखाद्या स्वयंसेवी संस्थेत पाठवलं जाणार आहे.