Monsoon Rain: देशातील शेतकरी बांधवांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. वर्ष 2026 च्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (Southwest Monsoon) भारताकडे आपली वाटचाल अधिक गतिमान केली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आज 18 मे २०२६ रोजी मोसमी वाऱ्यांनी आग्नेय अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत, कोमोरीन भाग आणि नैऋत्य व आग्नेय बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये यशस्वी प्रगती केली आहे.
Monsoon Rain: अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचे आगमन
मोसमी वाऱ्यांनी अंदमान समुद्राचा बहुतांश भाग व्यापला असून, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन झाले आहे. याशिवाय, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांतही मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनची ही प्रगती वेळेआधी आणि समाधानकारक मानली जात आहे.
Monsoon Rain: पुढील 3-4 दिवस महत्त्वाचे; हवामान अनुकूल
हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की, मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी सध्या हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत नैऋत्य मोसमी वारे आग्नेय अरबी समुद्र, कोमोरीन क्षेत्र, नैऋत्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागांत तसेच पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये वेगाने पुढे सरकतील. अंदमानमध्ये मान्सून वेळेत दाखल झाल्यामुळे आता भारताच्या मुख्य भूमीवर म्हणजेच केरळमध्ये मान्सून कधी धडकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Monsoon Rain: यंदा वेळेआधीच केरळात होणार आगमन
यंदा नैऋत्य मान्सून वेळेआधीच केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सामान्यत: 1 जूनच्या सुमारास पोहोचणारा मान्सून यंदा 26 मे रोजीच केरळ किनारपट्टीवर धडकू शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने मान्सूनचा वेग वाढला आहे. यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणताही मोठा अडथळा येणार नसून तो सुरळीत पुढे सरकणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच, मान्सून 5 जूनपर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता असून 6 जूनपर्यंत तो कोकणात पोहोचू शकतो. तसेच 7 जूनपर्यंत पुण्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आणखी वाचा
