अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या सभेत एका शहीद जवानाच्या मुलीशी धक्काबुक्की झाल्याचं समोर आलं आहे. राहुल गांधींनी याबाबतचा व्हिडीओ पोस्ट करुन, भाजपवर टीका केली आहे.

गुजरातमधील नर्मदामध्ये विजय रुपाणी एका सभेला संबोधित करत होते. यावेळी एका शहिदाची मुलगी हातात कागद घेऊन मंचाच्या दिशेने जात होती. तिने मुख्यमंत्री रुपाणी यांना भेटण्याची विनंती केली. पण येथे उपस्थित असलेल्य़ा महिला पोलिसांनी तिला जमिनीवर जबरदस्त मारहाण केली. तसंच तिला धक्के मारत सभेबाहेर हाकलून दिलं.

मात्र यावेळी मुख्यमंत्री रुपाणी भाषण ठोकण्यात व्यस्त होते. या घटनेचा व्हिडी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी ट्विट केला असून, भाजवर जोरदार हल्ला चढवला आहे.


“15 वर्षांपासून शहिदांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही. केंद्र सरकारने केवळ आश्वासन दिली. आणि आता न्याय मागणाऱ्या शहिदाच्या मुलीचा आपमान केला जातो. भाजपवाल्यांनो जरा लाज बाळगा,” असं राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.