चेन्नई : मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी एका कुत्र्याला इमारतीच्या गच्चीवरुन खाली फेकल्याची संतापजनक घटना ताजी असतानाच आणखी एक भयावह प्रकार समोर आला आहे. मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमध्ये घुसलेल्या माकडाचा हालहाल करुन जीव घेतला, त्यानंतर त्याचा मृतदेह पुरल्याची माहिती आहे.

चेन्नईपासून 175 किलोमीटर अंतरावरील वेल्लूर जिल्ह्यात ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. गेल्या शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास हॉस्टेलमध्ये शिरलेल्या एका माकडाला चार विद्यार्थ्यांनी बांधून ठेवलं. त्यानंतर त्याला मारहाण केली. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठतत्याच्या लैंगिक अवयवांमध्ये रॉड घुसवल्याने माकडाचा मृत्यू झाला.

माकडाचा मृतदेह विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या परिसरातच गाडला. माकडाचा मृतदेह जमीन उकरुन गुरुवारी बाहेर काढण्यात आला. अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या वेल्लूरमधील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधून ही घटना समोर आल्याने चीड व्यक्त केली जात आहे. कॉलेज प्रशासनाने तातडीने संबंधित कारवाई करत विद्यार्थ्यांना निलंबित केलं आहे.

मुंबईतल्या एका प्राणीप्रेमीने यासंबंधी माहिती दिल्यानंतर घडलेला प्रकार समोर आला. ही घटना घडली तेव्हा जवळपास 30 विद्यार्थी उपस्थित होते. जेस्पर सॅम्युअल साहू, रोहित कुमार येनुकोटी, अरुण ल्युई शशी कुमार आणि अॅलेक्स चेकालाईल यांच्याविरोधात बगायम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माकडाचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा त्याचा गळा, हात आणि पाय बांधलेल्या अवस्थेत होते. एक टोकदार रॉडही घुसवण्यात आला होता. मृत्युमुखी पडलेल्या माकडाचं वय अंदाजे एक वर्ष होतं. यापूर्वी चेन्नईतच मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी एका कुत्र्याला गच्चीवरुन खाली फेकलं होतं. सुदैवाने कुत्र्याचा जीव वाचला होता. मात्र भविष्यातील डॉक्टरच इतके क्रूरपणे वागत असतील, तर इतरांचं काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या :


कुत्र्याला गच्चीवरुन फेकणारे एमबीबीएस विद्यार्थी परागंदा