Mathura News : उत्तर प्रदेशातील मथुरामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. यमुना नदीत एक बोट (स्टीमर) उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर 10 ते 12 लोक बेपत्ता असल्याची माहिती देखील मिळत आहे. इतर अनेक जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना केसी घाटाजवळ घडली आहे.
बोटत एकूण 30 लोक होते
अपघाताबाबत जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2 वाजून 45 मिनीटांनी यमुना नदीत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. लुधियानाहून 30 लोक बोटीने प्रवास करत होते. यावेळी केसी घाटाजवळ ही बोट उलटली. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरु केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. लोकांचा जीव वाचवण्याला आमचे प्राधान्य आहे. रुग्णालयांनाही सतर्क करण्यात आले आहे. रामकृष्ण मिशन रुग्णालय हे आमचे सर्वात मोठे रुग्णालय असून, आम्ही तेथे हाय अलर्ट जारी केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
पोलीस आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी दाखल झाली. डायव्हर्सच्या मदतीने जलद बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत यमुना नदीतून 13 जणांना बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे, तर 5 जण सुरक्षित आहेत. बचावकार्य सुरू असून, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासन बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. या घटनेबाबत मथुरा एसपी (ग्रामीण) सुरेश चंद्र रावत यांनी सांगितले की, यमुना नदीत एक बोट उलटली. अनेकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. किती लोक सुरक्षित आहेत आणि किती जणांनी दुर्दैवाने आपले प्राण गमावले आहेत, हे निश्चित करण्यासाठी आम्ही सध्या परिस्थितीचा आढावा घेत आहोत. तरंगता पूल खराब अवस्थेत होता आणि एक एजन्सी त्या तरंगत्या पुलांची दुरुस्ती करत होती. या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळेच हा अपघात झाला असावा, असा संशय आहे.
मुख्यमंत्री योगी यांनी घेतली अपघाताची दखल
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेतील बोट उलटण्याच्या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आणि अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले. त्यांनी अधिकाऱ्यांना मृतांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही दिले.