मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) हे दिल्ली (Delhi) दौऱ्यावर असून त्यांनी शाळकरी मृत शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची भेट घेतली. या प्रकरणात केंद्र सरकारने तात्काळ कारवाई करावी, दोषी शिक्षकांवर कारवाई करावी, तसेच संबंधित शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. येथील पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सवाल केले आहेत. दरम्यान, दुसरीकडे महाराष्ट्रातील खासदारांनी अमित शाह (Amit shah) यांची भेट घेत शौर्य पाटील मृ्त्यूप्रकरणात चौकशीची मागणी केली. त्यावेळी, अमित शाह यांनी शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी SIT नेमण्याचं आश्वासन दिलं.  एकीकडे मनोज जरांगे पाटील हे शौर्य पाटीलच्या कुटुंबीयांची भेट घेत असताना दुसरीकडे मविआचे खासदार अमित शाहांना भेटले आहेत. त्यावेळी, अमित शाह यांनी तात्काळ एसआयटी नेमण्याचे आश्वासन दिले. उद्याच विशेष तपास पथक नेमण्याबाबत सूचना देतो, असे अमित शाह यांनी म्हटले. खासदार निलेश लंके यांच्याकडून अमित शाह यांना पत्र देण्यात आलं असता, याबाबत माझ्याकडे शरद पवार यांचेही पत्र आल्याचे अमित शाह यांनी सांगितले. 

Continues below advertisement

याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनीही भूमिका मांडली. सरकारने नेमलेल्या समितीने अहवाल दिलेला आहे, त्यानुसार या घटनेला, शौर्यच्या मृत्यूला शाळा आणि शिक्षकच जबाबदार आहेत. त्यामुळे, या अहवालानुसार तरी अमित शाह यांनी पाटील कुटुंबीयांवर मरणोत्तर अन्याय होऊ देऊ नये, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. 

आम्ही मुंबई बंद करू शकतो

शौर्य पाटील मृत्यू प्रकरणात आठ दिवसात आरोपींना अटक न झाल्यास मिशनरी शाळेचे जे फादर आहेत त्यांनी दखल घ्यावी. महाराष्ट्रात इतर राज्यात यांच्या (शाळेच्या) शाखा आहेत हे लक्षात ठेवावे. मी अमित शाह यांना सांगतो की, तुम्ही लक्षात घ्या. मराठ्यांचा एक पोरगा मेला आहे तर मरू द्या असं अमित शाह यांना वाटत का? त्यांना आनंद होतो का? नरेंद्र मोदी साहेबांनीही लक्ष दिलं पाहिजे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. मुंबई आम्ही बंद करू शकतो, आमच्या मुलाचे बलिदान वाया जाणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. 

Continues below advertisement

अमित शाह यांची भेट घेणार का, असा सवाल जरांगे पाटील यांना केला असता, ते काय चौथी पास आहेत का त्यांना भेटून सांगायला. त्यांना कळत नाही का? असा प्रतिप्रश्न जरांगे पाटील यांनी केला. मध्य प्रदेशसह इतर राज्यात मराठा तुम्हाला लागतो, अमित शाह यांनी आरोपीला 8 दिवसांत अटक करावी अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली. 

शाळेच्या संस्थापकांना इशारा

राष्ट्रगीत झालं पाहिजे असं म्हणणारा मुलगा होता, किती राष्ट्राभिमान होता. शाळेवर लिहिलेलं असतं दया करा, शांती. मग आमच्या मुलासोबत असं का केलं. तुमच्या शाळा महाराष्ट्रात पण आहेत हे लक्षात ठेवा, असा इशाराच जरांगे पाटील यांनी शाळेच्या संस्थापकांना दिला आहे.

हेही वाचा