पोटदुखीच्या त्रासामुळे मनोहर पर्रिकर ‘लीलावती’त दाखल
एबीपी माझा वेब टीम | 15 Feb 2018 06:07 PM (IST)
मनोहर पर्रिकर यांची आता सुधारत आहे, अशी माहिती गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली.
पणजी (गोवा) : गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटात दुखू लागल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. फूड पॉयझनिंगच्या त्रासानंतर पोटात दुखू लागल्याने, प्रथमत: त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार करण्यात आले. मात्र अधिकच्या उपचारासाठी त्यांना मुंबईत आणण्यात आले आणि लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मनोहर पर्रिकर यांची प्रकृती आता सुधारत आहे, अशी माहिती गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली. मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत. त्याआधी त्यांनी देशाच्या संरक्षण मंत्रालयाची धुराही सांभाळली. आपल्या साध्या राहणीमानामुळे ते सर्वपरिचित आहेत.