(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Man Ki Baat : वर्षातून एकदा 'नदी उत्सव' साजरा करा; जागतिक नदी दिनानिमित्त पंतप्रधान मोदींने आवाहन
Man Ki Baat : वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करा; असं आवाहन आज मन की बातमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी केलंय. तर 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त अनोखा विक्रम करण्याचंही आवाहन त्यांनी केलं
Man Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 81व्या मन की बात या आकाशवाणी कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. पंतप्रधानांनी कार्यक्रमाची सुरुवात विश्व नदी दिनाच्या महत्त्वानं केली. आज 'वर्ल्ड रिव्हर डे' आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी आपल्या कार्यक्रमात नद्यांच्या महत्त्वाबाबत सांगितलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "नदी आपल्यासाठी एक भौतिक वस्तू नाही, तर जीवंत अस्तित्व आहे. म्हणूनच आपण नद्यांना आई म्हणतो. आपले कितीही सण-उत्सव असोत, ते सर्व आपल्या या मातेच्या कुशीतच होतात."
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आपल्याकडे असं म्हणतात की, "पिबन्ति नद्यः, स्वय-मेव नाम्भः" अर्थात नद्या आपलं जल स्वतः पित नाहीत, तर परमार्थासाठी देतात. आपल्यासाठी नद्या एक भौतिक वस्तू नाहीत, तर आपल्यासाठी नद्या जीवंत अस्तित्व आहेत. म्हणूनच आपण नद्यांना आई म्हणतो. आपले कितीही सण-उत्सव असोत, ते सर्व आपल्या या मातेच्या कुशीतच होतात."
महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांचं देशवासियांना आवाहन
"2 ऑक्टोबर हा दिवस देशभरात महात्मा गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. मात्र, या दिवशी देशवासियांनी एक अनोखा विक्रम प्रस्थापित करावा", असं आवाहन आज मन की बातमधून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पुढे बोलताना मोदी म्हणाले की, "गेल्या काही वर्षांत देशात खादी आणि हँडलूमचं उत्पादन अनेक पटींनी वाढलं आहे. दिल्लीच्या खादी शोरूममध्ये अनेकदा एका दिवसांत 1 कोटीहून जास्त रुपयांचा व्यवहार झालाय. आता येत्या 2 ऑक्टोबरला बापूजींच्या जयंतीच्या दिवशी आपण पुन्हा एकदा नवा विक्रम करुयात. तुम्ही तुमच्या शहरांमध्ये जिथे कुठे खादी, हँडलूम, हँडिक्राफ्टची विक्री होत असेल, तिथून तुमची खरेदी करा. दिवाळीचा उत्सव देखील येऊ घातला आहे. त्यामुळे आपली सर्व खरेदी अशा ठिकाणांहून करून 'व्होकल फॉर लोकल' या अभियानाचे आत्तापर्यंतचे सगळे रेकॉर्ड आपण मोडुयात", असं आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केलं.
पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर होते. अमेरिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर आज मोदींनी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 76व्या सत्राला संबोधित केलं. या सत्रात त्यांनी पाकिस्तान आणि इमरान खान यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. ते म्हणाले होते की, जे देश दहशतवादाचा आधार घेत आहेत, त्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, यामुळे त्यांनाही धोका आहे. तसेच अफगाणिस्तानाचा वापर आपल्या स्वार्थासाठी कोणी करु नये, असा इशाराही मोदींनी यावेळी दिला.