Manish Sisodia Arrested: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने चौकशीनंतर अटक केली आहे. सीबीआयने आज सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावले होते. जवळपास 8 तास त्यांची चौकशी करण्यात आली. सिसोदिया यांना दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सिसोदिया यांच्या अटकेचा आम आदमी पक्षाने निषेध केला आहे. पक्षाने याला भाजपचे कारस्थान म्हटले आहे. मात्र नेमकं काय आहे हे प्रकरण ज्यामुळे सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे. याबाबतच सविस्तर माहिती जाणून घेऊ...
Manish Sisodia Arrested: काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
1. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण 2021 मध्ये सादर केलेल्या दिल्लीच्या नवीन दारू विक्री धोरणाशी संबंधित आहे (आता रद्द करण्यात आले आहे). केजरीवाल सरकारने 2021 मध्ये मद्यविक्रीसाठी नवीन धोरण तयार केले होते. ज्यामध्ये कथित घोटाळ्याचा आरोप आहे. वाद वाढल्यानंतर तो रद्दही करण्यात आला.
2. या धोरणात सरकारचा दारूविक्रीशी काहीही संबंध नसून केवळ खासगी दुकानांनाच दारू विक्री करण्याची परवानगी होती. मद्याचा काळाबाजार रोखणे, महसूल वाढवणे आणि ग्राहकांचा चांगली सुविधा मिळावी हा त्याचा मुख्य उद्देश होता. मनीष सिसोदिया हे दिल्लीच्या उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात आले आहेत.
3. या धोरणांतर्गत दिल्लीत मद्याची होम डिलिव्हरी आणि दुकाने पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. परवानाधारक मद्यावर अमर्यादित सूट देखील देऊ शकत होते.
4. नव्या धोरणात तरुणांचे दारू पिण्याचे वयही कमी करण्यात आले. त्यावरून बराच गदारोळ झाला. केजरीवाल सरकार तरुणांना नशेच्या आहारी ढकलत असल्याचा आरोप भाजपने केला.
5. दिल्ली सरकारने या धोरणातून उत्पन्नात लक्षणीय 27 टक्के वाढ नोंदवली. ज्यामुळे सुमारे 8,900 कोटी रुपये उत्पन्न झाले. याचदरम्यान दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आणि दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी या प्रकरणात गैरप्रकार झाल्याची भीती व्यक्त केली. या धोरणाविरोधात उपराज्यपालांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.
6. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात सिसोदिया यांचे नाव अद्याप आलेले नाही, परंतु गेल्या वर्षी सीबीआयने त्यांच्या घरासह 31 ठिकाणी छापे टाकले आणि आता त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी यापूर्वीही अनेकांना अटक करण्यात आली आहे.
7. सीबीआयशिवाय ईडीही या घोटाळ्याची चौकशी करत आहे. मगुंथा श्रीनिवासुलरेड्डी यांचा मुलगा मगुंथा राघव याला ईडीने अलीकडेच अटक केली आहे. ईडीचा दावा आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील दारू व्यवसायासंदर्भात मागुंता श्रीनिवासुलरेड्डी यांची भेट घेतली होती.
8. याआधी सीबीआयने तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या कविताचे पूर्वी चार्टर्ड अकाउंटंट असलेले बुचीबाबू गोरंतला यांना अटक केली होती. 12 डिसेंबर रोजी सीबीआयच्या पथकाने कविता यांची देखील हैदराबादमध्ये 7 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली होती. कविता या दक्षिण कार्टेलचा भाग असल्याचा आरोप केंद्रीय यंत्रणेने केला होता, तसेच त्यांना मद्य धोरण प्रकरणात लाच घेतल्यामुळे फायदा झाला होता, असा आरोप आहे.
9. सीबीआय एफआयआरमधील आरोपी क्रमांक एक असलेल्या सिसोदिया यांची मागील वर्षी 17 ऑक्टोबर रोजी चौकशी करण्यात आली होती. याच्या एक महिन्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले.
10. सीबीआयच्या आरोपपत्रात सिसोदिया यांचे नाव नव्हते. कारण त्यावेळी सीबीआयचा इतर संशयित आणि आरोपींविरुद्ध तपास सुरू होता.