2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींना 'नीच' असं संबोधलं होतं. अय्यर यांच्या वक्तव्याचा फटका काँग्रेसला निवडणुकीतही बसला होता. त्यानंतर काँग्रेसने अय्यर यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र आजही आपण त्या वक्तव्यावर ठाम असल्याचं अय्यर यांनी सांगितलं.
मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मणिशंकर अय्यरांची काँग्रेसमध्ये वापसी
'पाकिस्तानी रडारपासून वाचण्यासाठी ढगांचा आसरा घेण्याचा भारतीय वायुसेनेला सल्ला दिला होता' हे मोदींनी केलेलं वक्तव्य आश्चर्यकारकरित्या मूर्खपणाचं होतं, असं अय्यर म्हणाले. 'अशाप्रकारे अवैज्ञानिक दावे करताना मोदी वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मूर्ख समजतात का? आणि निर्ढावलेल्या पंतप्रधानांची चूकही सुधारता न येण्याइतके हे अधिकारी भित्रे आहेत का?' असा प्रश्न अय्यर यांनी उपस्थित केला आहे.
VIDEO | मोदी 'नीच' असल्याच्या 2017 साली केलेल्या वक्तव्यावर मणिशंकर अय्यर अजूनही ठाम | एबीपी माझा
डिसेंबर 2017 मध्ये मणिशंकर अय्यर नेमकं काय म्हणाले होते?
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी एका व्यक्तीचं मोठं योगदान होतं, त्यांचं नाव म्हणजे जवाहरलाल नेहरु आणि अशा कुटुंबाबद्दल घाणेरडे वक्तव्य केली जातात, तेही डॉ. आंबेडकरांच्या नावाने मोठ्या वास्तूच्या उद्घटनावेळीच. मला वाटतं ही (नरेंद्र मोदी) व्यक्ती अत्यंत नीच प्रकारची आहे. तिच्यात कोणतीही सभ्यता नाही. अशा चांगल्या प्रसंगी घाणेरड्या राजकारणाची काय गरज आहे?", असे मणिशंकर अय्यर म्हणाले होते.
अय्यर यांच्या 'त्या' वक्तव्यावेळी मोदींचं प्रत्युत्तर
सुरतमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली होती. अय्यर यांनी आपल्याला उद्देशून वापरलेले शब्द म्हणजे गुजरातचा अपमान असल्याचं मोदींनी म्हटलं होतं. "उच्च-नीच हे देशाचे संस्कार नाहीत. माझ्यासारख्याने चांगले कपडे परिधान केल्याचे मुघल संस्कार असणाऱ्यांना बघवत नाहीत. मी भलेही खालच्या जातीतला असेन, मात्र काम उच्च आहेत.", असं मोदी म्हणाले होते.
राहुल गांधींनी केला होता निषेध
भाजप आणि पंतप्रधान मोदी कायमच काँग्रेसविरोधात घाणेरडी भाषा वापरत असतात. मात्र, काँग्रेसचे संस्कार आणि वारसा वेगळा आहे. त्यामुळे मणिशंकर अय्यर यांनी मोदींना उद्देशून वापरलेल्या शब्दाचं मी समर्थन करणार नाही. किंबहुना, काँग्रेस पक्ष आणि मी अशी अपेक्षा करतो की, त्यांनी मोदींबाबत वापरलेल्या शब्दाबद्दल माफी मागावी.", असं म्हणत राहुल गांधींनी मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला होता.
मणिशंकर अय्यर यांची तेव्हाची दिलगिरी
सर्वच स्तरातून झालेल्या टीकेनंतर मणिशंकर अय्यर यांनी माफी मागितली होती. "मी इंग्रजीतील 'Low' शब्दाचा अनुवाद 'नीच' असा केला होता. हिंदी ही माझी मातृभाषा नाही. तरीही चुकीचा अर्थ निघाला असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो.", असं म्हणत मणिशंकर अय्यर यांनी खेद व्यक्त केला होता.