Man Stole a Shivling : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कौशांबी जिल्ह्यातील एका मंदिरातून एका व्यक्तीनं शिवलिंग (Shivling) चोरल्याची घटना घडली आहे. आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न करण्याची प्रार्थना त्या व्यक्तीनं केली होती. पण ती पूर्ण झाली नाही. त्यामुळं त्यानं शिवलिंग चोरुन मंदिराच्या मागे असलेल्या झाडीत लपवले होते. छोटू असे या आरोपीचं नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक करुन चोरी केलेलं शिवलिंग ताब्यात घेतलं आहे. 


रागाच्या भरात चोरले शिवलिंग 


आरोपी छोटूला (27) त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करायचे होते. परंतु त्याच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळं छोटू हा नियमितपणे गावातील शिवलिंगाची तासनतास पूजा करीत असे. आपल्या कुटुंबातील सदस्यांचे मन वळावं, त्यांनी लग्नाला परवानगी द्यावी, या आशेनं छोटूनं भगवान शिवाची प्रार्थना करण्यास सुरुवात केली होती. आपल्या भक्तीच्या माध्यमातून कुटुंबातील सदस्यांच्या मनावर परिणाम होऊन ते लग्नास परवानगी देतील असे तो स्थानिक नागरिकांना सांगत होता. मात्र, आता पावसाळा संपतआला तरी त्याचे लग्न झाले नाही. तेव्हा त्याचा पारा चढला. आरोपी छोटूने रागाच्या भरात शुक्रवारी मंदिरात पोहोचून शिवलिंग चोरले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत शिवलिंग ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी पुन्हा आहे त्या ठिकाणी म्हणजे कौशांबी जिल्ह्यातील महेवाघाट कोतवालीचा कुम्हियावान बाजार या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली आहे. 


आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी 


जेव्हा गावकऱ्यांना मंदिरातून शिवलिंग गायब झाल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती सांगितली. त्यानंतर महेवाघाट पोलिस स्टेशनचे पथक गावात पोहोचले आणि त्यांनी संबंधीत प्रकरणाचा तपास सुरु केला. आरोपी छोटूनं मंदिराच्या मागे असणाऱ्या झाडीत शिवलिंग लपवले होते. याप्रकरणी आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.


छोटूला करायचे होते नातेवाईकाच्या मुलीशी लग्न 


छोटूला त्याच्या एका नातेवाईकाच्या मुलीशी लग्न करायचे होते. पण त्याच्या कुटुंबीयांना ते मान्य नव्हते. यानंतर श्रावण महिन्यात छोटूनं भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन पूजा करण्यास सुरुवात केली होती. आपल्या आवडीच्या मुलीशी लग्न व्हावं आणि घरच्यांच्या मनात परिवर्तन होऊन त्यांनी लग्नाला परवानगी द्यावी अशी मनोकामना देवाकडं छोटूनं केली होती. छोटू दररोज सकाळ संध्याकाळ मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करत अस्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Baramati Crime : ज्योतिषाकडून मुहूर्त काढून चोरी, बारामतीमध्ये चार महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा, पाच जण अटकेत