नवी दिल्ली :  केंद्र सरकारकडून राज्य मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Sinh) यांनी राज्यसभेत सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मांडलं. हे विधेयक काल लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकावर बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज, पॅलेट गनच्या वापराचे आदेश कोणी दिले असा सवाल खरगेंनी केला. देशाला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, गृहमंत्री त्याची उत्तर देऊ शकत नसतील तर अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी खरगेंनी केला.  

पेपर चोरणारे वाचले, मेहनत करणारे मार खात राहिले, हा कसला न्याय, ही कसली पद्धत असा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.पेपरलीक झाल्यानं कित्येक निर्दोष लोकांचं नुकसान झालं, कित्येक लोकांना मारहाण झाली, कित्येक आई वडील त्रस्त आहेत, कित्येक महिला, मुलं त्रस्त आहेत हे समोर आणायचंय, असं खरगे म्हणाले. 

सरकारनं जे विधेयक आणलंय त्यात आकडेवारी बदलली आहेत, त्यातून काही होणार नाही. जादा दंड, कठोर शिक्षा, स्पेशल टास्क फोर्स, फास्ट ट्रॅक कोर्ट यासारख्या गोष्टींचा उल्लेख त्यात आहे, त्यामुळं काही फरक पडणार नाही, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. पेपरफुटी कशी रोखणार हे सरकारनं सांगायला पाहिजे होतं, असं खरगे यांनी म्हटलं होतं. 2024 मध्येच मजबूत कायदा आणावा अशी मागणी केली होती, तेव्हा तुम्ही आमचं ऐकलं नाही. आता ज्या गोष्टी करताय त्या 2024 मध्ये का केल्या नाहीत, कारण तेव्हा तुम्हाला राजकारण करायचं होतं, असा हल्लाबोल मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. सरकारनं आकडे बदलले मात्र पेपरफुटी कशी रोखणार याचा उद्देश सांगितला नाही. रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी बिल आणलं गेलंय, असं खरगे यांनी म्हटलं. 

खुर्ची वाचवण्यासाठी प्रधानांचा राजीनामा : मल्लिकार्जुन खरगे

देशातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थी आणि तरुणांनी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आवाज उठवला. विरोधी पक्षांनी विद्यार्थ्यांचा आवाज रस्त्यापासून संसदेपर्यंत उचलला. दबाव वाढल्यानं विद्यार्थ्यांच्या संघर्षापुढं झुकावं लागलं. पंतप्रधानांना प्रधानांना हटवावं लागलं, ही युवकांची ताकद आहे. तरुणांची ताकद पाहून सरकारला वाटलं की आणखी ताणल्यास धागा तुटेल आणि आपली खुर्ची जाईल, त्यामुळं अखेरीस त्यांनी विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली. स्वत: खुर्ची वाचवण्यासाठी त्यांनी प्रधानांचा राजीनामा घेतला, असा हल्लाबोल मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. 

अमित शाह यांनी राजीनामा द्यावा : मल्लिकार्जुन खरगे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह बोलत नाहीत. दिल्लीत इतकी गडबड होऊन देखील गृहमंत्री काही बोलत नाहीत, तोंड शिवलं का कोणी, देशाच्या भल्यासाठी बोलावं लागतं. अपमान सहन करावा लागतो. अशा शब्दात मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला. 20 जुलै रोजी हजारो विद्यार्थी संसदेवर मार्च काढणार होते, त्यांना संवाद हवा होता. लाठीचार्ज, अश्रूधूर, वॉटर कॅनन, पॅलेट गन, करंटच्या बॅरिकेडस, खिळे असणाऱ्या काठ्या, मेट्रो बंद, इंटरनेट बंद हे त्यांना मिळालं. हे सर्व तुम्ही केलं, त्यामुळं विद्यार्थी संतापले, नागरिक संतापले. तुम्ही विद्यार्थ्यांसोबत शांततेत बोलू शकला नाही. 100 हून अधिक विद्यार्थी आंदोलक जखमी झाले, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.  गावागावातून आलेल्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवल्या गेल्या, ते विद्यार्थी दवाखान्यात आहेत, कोणाचा डोळा गेला, कान गेला, हात तुटला, पाय तुटला याचे जबाबदार गृहमंत्री आहेत, असा हल्लाबोल खरगे यांनी अमित शाह यांच्यावर केला. बंद खोलीत तुम्ही खूप दिवस राहू शकत नाही, तुम्हाला आम्ही खेचून बाहेर काढू, असा इशारा खरगे यांनी दिला. मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीतील आंदोलकांवरील लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापराच्या मुद्यावरुन अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.