नवी दिल्ली : ज्या पाटीदार आंदोलनामुळे हार्दिक पटेलला गुजरातमध्ये नवी ओळख मिळाली. त्याच पाटीदार आंदोलनाच्या 'पाटीदार ऑर्गनायझेशन'मध्ये रोज फूट पडत आहे. गुजरात निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेलला आणखी एक मोठा दणका मिळाला असून, हार्दिकसोबत उभ्या असणाऱ्या संघटनांनी आपली वेगळी चूल मांडली आहे.
'पाटीदार ऑर्गनायझेशन'मधील 6 प्रमुख संघटनांनी हार्दिकपासून फारकत घेऊन आपली वेगळी चूल मांडली. आज या संघटनांनी अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन हार्दिक पटेलवर टीकेची झोड उठवली. हार्दिक पटेल आरक्षणाच्या मुळ मुद्द्यावरुन भटकला असून, तो प्रत्येक ठिकाणी स्वत: चा वैयक्तिक स्वार्थ पाहात असल्याची टीका पाटीदार आंदोलनातील नेत्यांनी केली. तसेच हार्दिक पटेल आरक्षणाच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजून घेतल असल्याचा आरोपही पाटीदार नेत्यांनी केला.
'पाटीदार ऑर्गनयझेशन'मधून बाहेर पडणाऱ्यांमध्ये उमिया माताजी संस्था (उंझा), खोडलधाम (कागवद,राजकोट), विश्व उमिया फाऊंडेशन (अहमदाबाद), समस्त पाटीदार समाज (सुरत), उमिया माताजी मंदिर (सिदसर), सरदारधाम (अहमदाबाद) या संघटनांचा समावेश आहे.
या संघटनांनी हार्दिक पटेलवर टीकेची झोड उठवत, आंदोलनकर्त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. तसेच प्रत्येक गावात सभा घेऊन समाजातील नागरिकांना जागृत केलं जाईल, असं सांगितलं.
पाटीदार ऑर्गनायझेशनमध्ये फूट पडल्याने हार्दिक पटेल सोबतच राहुल गांधींसाठी मोठा दणका असल्याचं बोललं जात आहे. कारण, गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून पाटीदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. पण त्यातच पाटीदार आंदोलनातच उभी फूट पडली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हार्दिक सोबत जे पाटीदार होते, त्यांची संख्या दिवसेंदिवस रोढावत आहे. पाटीदार समाजातील जुन्या पीढीचे लोक आजही भाजपला समर्थन देतात. त्यातच नव्या पिढीचे तरुणही आता भाजपच्या बाजूने जात आहेत.
राज्यात सत्ता स्थापनेसाठी पाटीदार समाजाचा पाठिंबा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण गुजरातमध्ये पाटीदार समजाची लोकसंख्या एकूण 15 टक्के आहे. या 15 टक्क्यांपैकी 60 टक्के लेवा पटेल, 40 टक्के कडवा (पटेल) समाज आहे. त्यातील भाजपचे 182 पैकी 44 आमदार पाटीदार समाजाचे आहेत.
दरम्यान, पाटीदार आरक्षण संघर्ष समितीचे राष्ट्रीय संयोजक अश्विन पटेल यांनीदेखील काँग्रेसकडून आपल्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचं यापूर्वीच म्हटलं होतं. कारण, प्रदीर्घ काळापासून त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद दिला गेला नाही. त्यामुळे भाजपसोबत चर्चा करुन मागण्यांवर तोडगा काढला जाईल, असे संकेत दिले होते.
हार्दिक पटेलही काँग्रेसला समर्थन देण्याच्या बाजूने आहे. त्यामुळे एकापाठोपाठ एक पाटीदार समाजातील नेते हार्दिक विरोधात उभे ठाकत आहेत.
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्वामीनारायण आणि अक्षरधाम मंदिराचा दौरा पाटीदार समाजाला अजून भाजपच्या जवळ आणण्यास सहाय्यभूत होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
गुजरात निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेलला दणका, 'पाटीदार ऑर्गनायझेशन'मध्ये फूट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Nov 2017 10:26 PM (IST)
पाटीदार आंदोलनाच्या 'पाटीदार ऑर्गनायझेशन'मध्ये रोज फूट पडत आहे. गुजरात निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेलला आणखी एक मोठा दणका मिळाला असून, हार्दिकसोबत उभ्या असणाऱ्या संघटनांनी आपली वेगळी चूल मांडली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -