LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
LPG Gas Price Rise : या आधी दोनच दिवसांपूर्वी (7 जून) घरगुती गॅस सिलेंडरचा दर 29 रुपयांनी वाढला होता. त्यानंतर ही वाढ पुन्हा होण्याची शक्यता असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबई : देशातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Cylinder) किमतीत नुकतीच वाढ झाली असतानाच, येणाऱ्या काळात गॅस आणखी महाग होणार असल्याचे संकेत केंद्र सरकारनं दिले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे एलपीजी गॅसच्या किमतींवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या वाढत्या महागाईवर सरकारची बाजू स्पष्ट करताना, आगामी काळात पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरचे दर आणखी वाढू शकतात, असं स्पष्ट केलं आहे.
LPG Gas Supply Chain Disturbance : जगभरातील पुरवठा साखळी विस्कळीत
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वाढत्या दरांवर स्पष्टीकरण देताना जागतिक संकटाचा दाखला दिला. ते म्हणाले की, "गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यामुळे आम्हालाही दुःख आणि खेद आहे. मात्र, यावर टीका करण्यापूर्वी लोकांनी जगातील सद्यस्थिती समजून घेतली पाहिजे. सध्या संपूर्ण जग गंभीर संकटाचा सामना करत आहे. जगभरात मालाची वाहतूक आणि पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे."
प्रल्हाद जोशी पुढे म्हणाले की, "एलपीजी गॅस आता अत्यंत मर्यादित ठिकाणांवरून उपलब्ध होत आहे. गॅसची मूळ किंमत (Base Cost) वाढली आहे. शिवाय, माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आता तब्बल 40 ते 45 दिवस लागत आहेत, ज्यामुळे वाहतुकीचा खर्च आणि विम्याचा (Insurance) खर्च कमालीचा वाढला आहे."
आम्ही सर्वसामान्य जनतेच्या अडचणींबाबत तितकेच चिंतित आहोत, परंतु सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये गॅसच्या किमती वाढवणे हा सरकारचा नाईलाज झाला असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केलं. आहे.
LPG Current Rates : 7 जून रोजी दरांमध्ये वाढ
नुकतंच 7 जून रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या ताज्या दरवाढीनंतर आता मुंबईमध्ये 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 942 रुपयांवर पोहोचली आहे.
यापूर्वी कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरांमध्येही मोठी वाढ नोंदवली गेली होती. यामुळे हॉटेल व्यावसायिक, केटरर्स आणि खाद्यपदार्थांशी निगडित व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये आधीच प्रचंड चिंतेचे आणि तणावाचे वातावरण आहे. आता घरगुती गॅस सिलेंडरचे दर पुन्हा वाढणार असल्याने गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडणार असल्याचे चित्र आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से






















