Amendment To BNS Bill: बुलढाणा : सध्या देशभरात वैद्यकीय क्षेत्रात (Medical Field) एखाद्या डॉक्टरनं (Doctors) निष्काळजीपणा केला आणि त्यामुळे जर रुग्णाचा मृत्यू झाला, तर त्या डॉक्टरवर भारतीय दंड संहितेच्या कलम 304 A नुसार गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होत होता. या सर्व बाबींकडे डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशननं अनेकदा सरकारचं लक्ष वेधलं होतं. याचीच दखल घेत आता या कायद्यात बदल करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.


महत्त्वाची बाब म्हणजे, लोकसभेत (Lok Sabha Winter Session 2023) बुधवारी भारतीय न्यायिक (द्वितीय) संहिता विधेयकात सुधारणा मंजूरही करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्याही डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास डॉक्टरांना दोषी धरलं जाणार नाही. तसेच, अशा परिस्थितीत शिक्षा दोन वर्षांपर्यंत कमी करण्याची तरतूदही आहे, जी निर्दोष हत्येच्या श्रेणीत येत नाही. 


एखाद्या डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा कलम 304 ए नुसार गुन्हा दाखल केल्या जात होता. यावर विचार करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशननं 30 नोव्हेंबर रोजी सरकारला पत्र देऊन याकडे लक्ष वेधलं होतं आणि या कायद्यात बदल करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. त्यानुसार काल (बुधवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत माहिती देत प्रचलित कायद्यात नवीन बदल करून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जर मृत्यू झाला, तर त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा 304 A या कलमातून वगळण्यात येणार असून त्यात नवीन बदल करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. 


डॉक्टर्सकडून निर्णयाचं स्वागत 


दरम्यान, नक्की नवीन बदल काय? कसा असेल? याबाबत अद्यापही स्पष्टोक्ती नाही. मात्र, तरीही देशभरात या निर्णयाचं डॉक्टरांच्या संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकोज, फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन या सर्व संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सर्व स्तरातून डॉक्टर्स या निर्णयाचं स्वागत करत आहेत. 


वसाहती काळातील गुन्हेगारी कायद्यांमध्ये बदल करण्याच्या तीन विधेयकांवर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "सध्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला तर तोही दोषी हत्या मानला जातो. डॉक्टरांना यातून मुक्त करण्यासाठी मी आता अधिकृत दुरुस्ती आणणार आहे."


दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते


अमित शाह पुढे म्हणाले की, वैद्यकीय प्रक्रिया करताना नोंदणीकृत डॉक्टरनं असं कृत्य केलं तर त्याला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते आणि दंडही होऊ शकतो. कलम 106 (1) निष्काळजीपणामुळे मृत्यूला कारणीभूत ठरतं. पुढे बोलताना शाह म्हणाले की, दोषी हत्या प्रकरणांमध्ये डॉक्टरांची शिक्षा कमी करण्याची तरतूद दुरुस्तीमध्ये आहे. गृहमंत्र्यांनी सांगितलं की, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शिष्टमंडळानं यासंदर्भात त्यांना पत्र लिहिलं आहे.