नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण जाहीर करण्यात आले असून त्यानुसार रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो दर 6.25 टक्के तर रिव्हर्स रेपो दर 6 टक्के झाला आहे. रेपो दरात केलेल्या या कपातीमुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे दर कमी होणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर कमी करण्याची घोषणा केली 28 जानेवारी रोजी सरकारी बँकांसोबत झालेल्या बैठकीत गव्हर्नर दास यांनी रेपो दर कमी करण्याचे संकेत दिले होते. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला सर्व प्रकारची कर्जे स्वस्तात उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान सध्या सुरु असलेल्या कर्जांवरील व्याजदरही कमी होणार असल्याने बँकेचा हप्तादेखील कमी होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2020 साठी 7.4 टक्के इतके दरडोई उत्पन्नाचे लक्ष्य ठेवले आहे.
शेतकऱ्यांना आता 1.6 लाख रुपयांपर्यंतचे विना तारण कर्ज मिळू शकणार आहे. ही मर्यादा यापूर्वी 1 लाख रुपये इतकी होती. त्यामध्ये आता 60 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.