राबडी देवींमुळे RSSचा ड्रेसकोड बदलला: लालू प्रसाद यादव
एबीपी माझा वेब टीम | 12 Oct 2016 11:24 AM (IST)
पाटणा: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील बदलाचे श्रेय आपली पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडीदेवींना दिलं आहे. मागील 90 वर्षापासून आरएसएस स्वयंसेवक हे खाकी रंगाची हाफ पॅण्ट परिधान करीत होते. पण आता या गणवेशात बदल झाला असून आता स्वयंसेवक फूल पॅण्टमध्ये दिसणार आहेत. काल नागपूरमध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात स्वयंसेवक नव्या गणवेशात दिसून आले. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. 'आम्ही RSSला फूल पॅण्ट परिधान करायला लावलीच. राबडी देवींनी बरोबर म्हटलं होतं की, यांना संस्कृतीचं ज्ञान नाही, शरम येत नाही, वयोवृद्ध लोक देखील हाफ पॅण्ट घालून फिरतात.' याबाबत लालू प्रसाद यांनी अनेक ट्वीट केले. राबडी देवींच्या वक्तव्यांनी आरएसएसला गणवेशात बदल करण्यास भाग पाडलं. असंही लालू म्हणाले. याबरोबरच लालू प्रसाद यांनी आणखी एक ट्वीट केलं. त्यात ते म्हणाले की, 'आता तर आम्ही हाफ पॅण्टची फूल पॅण्ट करायला भाग पाडलं, पॅण्टच नाही विचारही बदलायला लावू, हत्यारं देखील टाकालयला लावू, विष पसरु देणार नाही.'