Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप असणारे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. अजय मिश्रा यांनी एबीपी नेटवर्कच्या पत्रकाराला धमकावलं आहे.  इतकंच नाही पत्रकाराचा मोबाईल खेचून कॅमेरे बंद केले. 


अजय मिश्रा यांनी पत्रकाराला “डोकं फिरलं आहे का?,” असे शब्द वापरले. मंत्र्याच्या अशा वागणुकीवर आणि त्यांच्या मस्तवाल वागणुकीवर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान एवढ्या ड्राम्यानंतरही मिश्रा यांना हटवलं जाणार नसल्याचं सूत्रांकडून कळतं आहे. 


 दरम्यान लखीमपूर खेरी येथील घटना हा सुनियोजित कट होता, असे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. एसआयटीने आता आरोपींवर लावण्यात आलेल्या कलमांमध्येही बदल केला आहे.   केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर आता निर्दोष हत्येऐवजी हत्येचा खटला चालणार आहे. लखीमपूर घटनेतील मुख्य आरोपी आशिष मिश्रासह 14 जणांवरील चौकशीनंतर कलमांमध्ये बदल करण्यात आला आहेत. सर्व आरोपींवर जाणीवपूर्वक नियोजन करुन गुन्हा केल्याचा आरोप आहे. SIT ने भांदवि (IPC) कलम 279, 338, 304A काढून 307, 326, 302, 34,120 B, 147, 148,149, 3/25/30 या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 


काय आहे प्रकरण?


यावर्षी 3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशामधील लखीमपूर खेरी येथील टिकुनिया येथे एका कार्यक्रमात कृषी कायद्यांचा निषेध करुन परतत असताना चार शेतकऱ्यांना कारने चिरडले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी उपस्थित होते. या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात काही लोकांचा मृत्यूही झाला होता. या घटनेत स्थानिक पत्रकार रमन कश्यप यांचाही मृत्यू झाला होता. शेतकऱ्यांना चिरडणारी गाडी अजय मिश्रा टेनी यांची असून त्यात त्यांचा मुलगा आशिष मिश्रा असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पहिली सुनावणी 8 ऑक्टोबर रोजी झाली. त्यानंतर आशिष मिश्रा उर्फ ​​मोनू याला अनेक तासांच्या चौकशीनंतर 9 ऑक्टोबरला अटक करण्यात आली.