नवी दिल्ली : बलात्काराचे दोषी असलेले माजी आमदार कुलदीप सेंगर याची पत्नी संगीता सेंगर यांचे तिकीट भाजपने कापले आहे. उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी ही माहिती दिली आहे. संगीता सेंगर यांना उन्नावच्या फतेहपूर चौरासी येथून पंचायत समिती सदस्यसाठी उमेदवारी देण्यात आली होती. विरोधीपक्षांनी यावरुन भाजपवर टीकेची झोड उठवली होती.


भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीसाठी जिल्हा पंचायत सदस्यांच्या अधिकृत उमेदवारांची जिल्हा यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये संगीता सेंगर यांना उमेदवार जाहीर करण्यात आली होती. संगीता सेंगर उन्नाव जिल्ह्यात बलात्काराचे दोषी असलेले माजी आमदार कुलदीप सेंगर यांची पत्नी असून यापूर्वी त्या जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष राहिल्या आहेत.


संगीता सेंगर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले होते की, 'भाजपची ही दुटप्पी भूमिका आहे. एकीकडे भाजप गुन्हेगारांना संपवण्याविषयी बोलतो आणि दुसरीकडे त्यांचा गौरवही करतो. भाजपच्या राजवटीत गुन्हेगारीचे उच्चाटन करता येणार नाही.


उन्नाव जिल्ह्यातील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात माजी आमदार कुलदीप सेंगर हे दोषी ठरवल्यानंतर दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने 20 डिसेंबर 2019 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सेंगरला शिक्षा झाली त्यावेळी ते उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ भागातील भारतीय जनता पक्षाचे आमदार होते आणि शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते.