किन्नौर : हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील दरड दुर्घटनेमुळं आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 लोकांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. अद्यापही 50 जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या भूस्खलनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमधील दृश्य अत्यंत भयावह आहेत. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, डोंगराच्या पायथ्यावरुन वाहणाऱ्या नदीत दरड कोसळली. त्यानंतर एक मोठा भाग राष्ट्रीय राजमार्गावर कोसळला.
हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात आपल्याकडे झालेल्या तळीये दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. दुपारी पावणे एकच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचं कळतंय. बचावकार्य सुरु असून आतापर्यंत 13 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. अद्यापही घटनास्थळी मोठे दगड कोसळत असल्यानं बचावकार्यात अडथळा येत आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 10 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
मृतांचा आकडा वाढण्याची भिती
राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक सुदेश कुमार मोक्ताने दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी आठ जण टाटा सूमो टॅक्सीमध्ये अडकले होते. मोख्ता याी सांगितलं री, हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (HRTC) ची एक बस, जी रिकांग पियो, शिमला त्यानंतर हरिद्वारला जात होती, ती अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकलेली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मृतांची संख्या आणखी वाढण्याती भिती आहे. बचावकार्य सुरु असलं तरी, अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी घेतली अपघाताची माहिती
किन्नौर येथे झालेल्या अपघातानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बचाव कार्य वेगाने करण्याच्या सूचना दिल्या आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकुर म्हणाले, "मी पोलिसांना आणि स्थानिक प्रशासनाला बचाव कार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफ ला देखील अलर्ट दिला आहे. एक प्रवासी बस आणि कार अडकल्याची माहिती मिळाली आहे. या बद्दलची सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही. किन्नौर येथे झालेल्या अपघातानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांनी फोन करून अपघाताची माहिती घेतली. तसेच घटनास्थळी लवकरात लवकर सुविधा पोहचवण्याचे आदेश दिले आहे.
एनडीआरएफ आणि आरोग्य विभागाला अलर्ट
मिळालेल्या माहितीनुसार बसमध्ये किती प्रवासी आहेत हे सरकारकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ज्या स्थानकावरून बस निघाली त्या ठिकाणावरून बसमधील प्रवाशांची यादी मागवण्यात आली आहे. एनडीआरएफ आणि आरोग्य विभागाला अलर्ट देण्यात आला आहे.
बचावकार्यात अडथळे
कमिशनर आबिद हुसैन सादिक म्हणाले, घटनास्थळी बचावकार्य वेगाने सुरु आहे. परंतु अजूनही दगड कोसळत असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहे. अद्याप घटनेची सविस्तर माहिती पुढे आलेली नाही. स्थानिक प्रशासन आणि पोलिस वेगाने काम करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
हिमाचलमधील दरड कोसळून भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू तर 25 पेक्षा अधिक जण बेपत्ता