Kerala News : केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दुर्मिळ वैद्यकीय घटना समोर आली आहे. थमारास्सेरी भागातील एका 9 वर्षीय मुलीचा अमीबिक इंसेफेलायटिस या अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेण्या आजारामुळे मृत्यू झाला आहे. या आजारामुळे मेंदूमध्ये झपाट्याने होणारे संक्रमण तिच्या मृत्यूचं कारण ठरलं.
तापापासून सुरुवात आणि दुर्दैवी अंत
13 ऑगस्ट रोजी मुलीला ताप येऊ लागल्यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती सतत खालावत गेल्याने 14 ऑगस्टला तिला कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, अमीबिक इंसेफेलायटिसमुळे मेंदूवर तीव्र परिणाम होतो. या आजारामुळे शरीराला वेळेत योग्य उपचार देणं कठीण ठरतं, कारण संक्रमण अतिशय वेगाने पसरतं आणि मेंदूच्या पेशी नष्ट करतं.
संक्रमणाचं मूळ दूषित पाण्यात
हा आजार प्रामुख्याने गोड्या पाण्यात जसं की तलाव, सरोवर, विहिरी अशा ठिकाणी असलेल्या नेगलेरिया फाउलेरी नावाच्या अमिबामुळे होतो. हे अमिबा नाकावाटे शरीरात प्रवेश करून थेट मेंदूवर आघात करतात. मृत झालेली मुलगी नेमकी कोणत्या जलस्रोतामुळे संक्रमित झाली, याचा शोध सध्या आरोग्य विभाग घेत आहे.
तलाव वा सरोवरात अंघोळ करणाऱ्या इतर नागरिकांचीही तपासणी केली जात आहे, जेणेकरून आणखी संक्रमणाची शक्यता ओळखता येईल आणि वेळेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील.
कोझिकोडमध्ये वर्षभरातील चौथा मृत्यू
अमीबिक इंसेफेलायटिसमुळे कोझिकोड जिल्ह्यात एका वर्षात मृत्यू झाल्याची ही चौथी घटना आहे. या आजाराचे दोन प्रकार असतात:
प्राथमिक अमीबिक मेनिंगोइंसेफेलायटिस (PAM)
ग्रॅनुलोमॅटस अमीबिक इंसेफेलायटिस (GAE)
या दोन्ही प्रकारांमध्ये, विशेषतः PAM मध्ये, नेगलेरिया फाउलेरी अमिबा शरीरात घुसताच मेंदूच्या ऊतींना झपाट्याने नष्ट करतो. त्यामुळे रोग ओळखून उपचार करण्यासाठी वेळ मिळत नाही आणि मृत्यूचे प्रमाण अधिक असते.
आरोग्य यंत्रणेपुढे मोठं आव्हान
मुलीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभाग या प्रकरणाची गंभीर दखल घेत असून संभाव्य जलस्रोतांची तपासणी, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या