तिरुअनंतपुरम :  हरियाणातील पंचकुला येथे एकाच कुटुंबातील सात जणांनी विष पिऊन जीवन संपवल्याची खळबळजनक घटना समोर आली, त्या घटनेनंतर आता दुसऱ्याच दिवशी केरळातही (Kerala Crime News) अशीच घटना समोर आली आहे. वक्कम शहरातील पती-पत्नीसह दोन तरुण मुलांनी गळफास घेत सामूहिक आत्महत्या (Kerala Crime News) केल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट बनल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडल्याचे समोर आले आहे. एका राष्ट्रीयीकृत बँकेकडून अनिल कुमार (वय 55) यांनी गृहकर्ज घेतले होते; पण ते कर्ज फेडण्यास ते असमर्थ होते. त्यांच्या पत्नी श्रीजा (50) या वारंवार आर्थिक परिस्थितीबद्दल सांगत असत, असे शेजाऱ्यांनी सांगितले आहे. अनिल कुमार, श्रीजा या दाम्पत्यासह अश्विन (25) आणि आकाश (22) यांनी घरातच गळफास घेत जीवन संपवल्याची घटना घडली आहे.

केरळमधील वक्कम शहरात ही घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चार सदस्य त्यांच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. मृतांमध्ये वडील, आई आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. पोलिसांना हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत होते. त्यामुळे त्यांनी टोताचं पाऊल उचलले असावे. यापूर्वी चंदीगडमधील पंचकुला येथेही असेच एक प्रकरण समोर आले होते. तिथेही एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केली होती.

वाढत्या कर्जामुळे कुटुंब त्रस्त 

अनिल कुमार (55), त्यांची पत्नी श्रीजा (50) आणि त्यांची मुले अश्विन (25) आणि आकाश (22) अशी मृतांची नावे आहेत, असे पोलिसांनी सांगितले. श्रीजा अनेकदा कुटुंबाच्या वाढत्या कर्जाबद्दल शेजाऱ्यांशी बोलत असत. काही वर्षांपूर्वी त्यांनी घर खरेदी करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडून मोठे गृहकर्ज घेतले होते. यानंतर त्याच्या आर्थिक समस्या सुरू झाल्या.

2019 मध्ये एका अपघातात अश्विन गंभीर जखमी झाला होता. त्याला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. तो सहा महिने रुग्णालयात उपचार घेत होता. यामुळे कुटुंबाचा खर्च आणखी वाढला आणि ते कर्जात बुडाले. सोमवारी संध्याकाळी 5 वाजता शेजाऱ्यांनी कुटुंबाला शेवटचे पाहिले. मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत घर बंद होते. एका शेजाऱ्याने घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहिले. आत जाऊन पाहिले तेव्हा घरातील चारही जण हॉलमध्ये लटकलेले होते.

पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कुटुंबाने आत्महत्या का केली हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. कुटुंबाच्या आर्थिक अडचणी आणि इतर संभाव्य कारणांचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. एका आनंदी कुटुंबाचा असा अंत झाला याचा सर्वांनाच धक्का बसला आहे.

अख्ख्या कुटुंबाने कारमध्ये उलट्या करत जीव सोडला

हरियाणातील पंचकुला या ठिकाणाहून एक अत्यंत हृदयद्रावक घटना सोमवारी रात्री पंचकुला येथे घडली आहे. उत्तराखंडमधील देहराडून येथील प्रविण मित्तल (वय 42) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सात सदस्यांचा एका कारमध्ये मृतावस्थेत आढळून आले. प्राथमिक तपासानुसार, प्रचंड कर्जबाजारीपणामुळे या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. प्रविण मित्तल, त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी आणि तीन मुले - दोन 13 वर्षांच्या जुळ्या मुली आणि 15 वर्षांचा मुलगा हार्दिक हे सर्वजण बागेश्वर धाम येथील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावून परतत होते. मध्यरात्री कार पंचकुला येथील एका घराजवळ पार्क करण्यात आली होती. स्थानिक रहिवाशांना गाडीबाबत संशय आला आणि जेव्हा त्यांनी आत पाहिलं, तेव्हा त्यांना सर्वांचे मृतदेह दिसले.