नवी दिल्लीः (Arvind Kejriwal) अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रीमंडळातील आरोग्य मंत्री असणाऱ्या सत्येंद्र जैन यांना ईडीने मनी लॉंड्रींग प्रकरणात अटक केली आहे, यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी ईडीने जैन यांना केलेल्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे, केजरीवाल यांनी ईडीची ही कारवाई “पूर्णपणे खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित” असल्याचे म्हटले आहे. या आरोपांमध्ये एक टक्का जरी सत्यता असती तर आम्हीच कारवाई केली असती, असे केजरीवाल यांनी ठामपणे सांगितले.



आप हा एक प्रामाणिक राजकीय पक्ष आहे. 'मी जैन यांच्यावरील खटल्याची कागदपत्रे तपासली असून अभ्यास केला आहे. हे पूर्णपणे बनावट आणि राजकीय कारणांनी प्रेरित आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. जैन हे सत्याच्या मार्गावर आहेत आणि ते स्वच्छ बाहेर येतील," असा विश्वास केजरीवालांनी व्यक्त केला. 


सोमवारी काही तासांच्या चौकशीनंतर जैन यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या फौजदारी कलमांतर्गत ताब्यात घेण्यात आले, असे अंमलबजावणी संचालनालय अधिकार्‍यांनी सांगितले. भाजप आणि काँग्रेसने सोमवारी दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अटकेचे स्वागत केले होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी जानेवारीमध्ये, केजरीवाल यांनी त्यांना सूत्रांकडून जैन यांना ईडीकडून अटक केली जाऊ शकते असे कळल्याचा दावा केला होता.


आपच्या आमदारांवर खोट्या केसेस


राजकीय आकसापोटी आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले होते. ही खोटी प्रकरणे न्यायालयात टिकू शकली नव्हती.


सत्येंद्र जैन यापूर्वी वादात


अरविंद केजरीवाल यांच्या मोहल्ला क्लिनिक योजनेच्या सल्लागारपदी सत्येंद्र जैन यांची मुलगी सैम्या हिची नियुक्ती करण्यात आली होती. त्या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली होती. ते प्रकरण देखील सीबीआयपर्यंत पोहोचलं होतं.


अरविंद केजरीवालांचे निकटवर्तीय


नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय म्हणून सत्येंद्र जैन यांना ओळखलं जातं. अरविंद केजरीवाल यांनी त्यांना आरोग्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. सत्येंद्र जैन यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनात देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती.