karnataka high court : कामाचा ताण आणि थकवा यामुळे कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये डुलकी लागली तर तो गुन्हा ठरत नाही असा निर्वाळा कर्नाटक हायकोर्टानं एका निकालात दिलाय. कर्नाटकातील एक कॉन्स्टेबल चंद्रशेखरचा कामाच्या वेळी डुलकी घेतानाचा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता. त्यानंतर या कॉन्स्टेबलला नोकरीवरून निलंबित करण्यात आलं. याविरोधात चंद्रशेखरनं हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवरील निकालात हायकोर्टानं स्पष्ट केलंय की, संविधानानुसार लोकांना झोपण्याचा आणि आराम करण्याचा मुलभूत अधिकार आहे. वेळोवेळी आराम आणि झोपेचंह आयुष्यात फार महत्त्व असल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलंय.

कायदा काय सांगतो -

मानवाधिकार कायद्याच्या कलम 24 नुसार प्रत्येकाला कामावरही आराम आणि सुट्टीचा अधिकार मिळालेला आहे. ज्यात कामाच्या तासांची योग्य वेळ आणि पगारासह सुट्ट्यांचा समावेश असतो. कामाच्या तासांमध्ये दिवसाला 8 तास आणि आठवड्याला 48 तासांहून अधिक नसावेत असं कायद्यात स्पष्ट म्हटलेलं आहे. काही परिस्थितीत हे नियम अपवाद असू शकतात. मात्र कामावर असतानाही काहीवेळ आराम करणं हा गुन्हा होतं नाही, असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय.

काय आहे प्रकरण -

चंद्रशेखर हा कर्नाटक राज्य परिवहन महामंडळात एक ट्रान्सपोर्ट कॉन्स्टेबल म्हणून कामाला आहे. निलंबित होण्यापूर्वी चंद्रशेखरनं सलग 2 महिने 16 तास शिफ्ट केल्यानंतर त्याला केवळ 10 मिनिटांची डुलकी लागली तर त्यात गुन्हा काय?, केवळ यासाठी कामावरून निलंबित करणं चुकीचं असल्याचा दावा चंद्रशेखरनं आपल्या याचिकेतून केला होता. ही बाब ग्राह्य धरत हायकोर्टानं केकेआरटीसीने दिलेला चंद्रशेखरच्या निलंबनाचा आदेश रद्द केला. तसेच परिवहन विभागाला खडे बोल सुनावत, कॉन्स्टेबल चंद्रशेखरला सलग दोन शिफ्टमध्ये काम लावणं ही प्रशासनाचीच चूक असल्याचं अधोरेखित केलं.

हायकोर्टाचा आदेश काय?

कोप्पल परिवहन विभागात कार्यरत चंद्रशेखरला निलंबित काळातील वेतन आणि इतर सर्व लाभ देण्यात यावेत. जर याचिकाकर्ता एकाच शिफ्टमध्ये काम करून झोपला असता तर ती त्याची चुक होती. मात्र विना ब्रेक 60 दिवस दिवसाला 16 तास काम करण्यासाठी त्याला भाग पाडलं गेलं. मे 2016 ते एप्रिल 2024 पर्यंत सेवेत असल्यानं त्याला त्याच्या कामाचा चांगलाच अनुभव आहे. दिवसात कामाचे 8 तास असतात. कामाच्या दबावामुळे चंद्रशेखर यांना सलग 2 शिफ्टमध्ये काम करावं लागत होतं. त्यामुळे एक दिवस त्याला डुलकी लागली म्हणून थेट निलंबित करणं योग्य नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Santosh Deshmukh Murder Case : 1 व्हिडीओ कॉल, 5 गोपनीय साक्षीदार, अन् 'ती' भेट,  वाल्मिक कराड आरोपी क्रमांक 1 कसा ठरला? CID ला काय काय सापडलं?