बेळगाव: भाजपच्या लिंगायत व्होट बँकेला खिंडार पाडून ती मतं काँग्रेसकडे खेचून आणण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) यांना काँग्रेसने मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही. रविवारी कर्नाटकातील 24 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली असून त्यामध्ये लिंगायत समाजातील मोठे नेते असलेल्या लक्ष्मण सवदी आणि जगदीश शेट्टर यांना काँग्रेसने मंत्रीपदाची शपथ न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 


बेळगावातील अथनी या मतदारसंघातून भाजपने तिकीट नाकारल्यानंतर लक्ष्मण सवदी यांनी अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या असलेल्या लक्ष्मण सवदी यांनी भाजपच्या उमेदवाराचा 75 हजारांहून जास्त मतांनी पराभव केला. 


Congress Laxman Savadi Athani : सवदींमुळे भाजपच्या 30 ते 35 जागा काँग्रेसकडे


लक्ष्मण सवदी हे कर्नाटकातील एक महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक नाव. लिंगायत समाजातील एक बडे प्रस्थ असलेल्या सवदींची या समाजातील व्होट बँकेवर वर्चस्व आहे. पण गेल्या निवडणुकीवेळी त्यांना काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत सवदी यांना तिकीट नाकारत महेश कुमठळी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ऐन प्रचार सुरू असताना सवदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि अथनीमधून उमेदवारी मिळवली. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक जिंकली. 


लक्ष्मण सवदी यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा फायदा झाल्याचं सांगितलं जातं. लक्ष्मण सवदी यांच्यामुळे मुंबई कर्नाटक म्हणजेच कित्तूर कर्नाटकातील जवळपास 30 ते 35 जागा काँग्रेसने भाजपकडून हिसकावून घेतल्याचं दिसून आलं. या भागातील लिंगायत मतदार मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडे आला. 


लिंगायत समाजाचे दुसरे नेते जगदिश शेट्टर यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसकडून निवडणूक लढवली. ते पराभूत झाले, पण त्यांच्या उमेदवारीचा फायदा काँग्रेसला झाला. त्यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या भागात लिंगायत समाजाने काँग्रेसला मतदान केलं. 


असं असतानाही काँग्रेसने मात्र लक्ष्मण सवदी या लिंगायत समाजातील बड्या नेत्याला मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही. यावर लक्ष्मण सवदी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांच्या मंत्रिमंडळात अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मी नुकतंच काँग्रेसमध्ये आलो आहे. राजकारणात संयम आणि दूरदृष्टी असणं गरजेचं आहे. या गोष्टी असतील तर राजकारण होतं. राजकारणात कोणीही साधू किंवा सन्याशी नसतो. प्रत्येकालाच मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बनण्याची इच्छा असते. 


Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणुकीवर होऊ शकतो परिणाम


कर्नाटकात लोकसभेच्या 28 जागा असून या जागा काँग्रेस आणि भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या 28 जागांपैकी 14 जागांवर लिंगायत मतांचं वर्चस्व असल्याचं चित्र आहे. त्यामुळे लक्ष्मण सवदी आणि जगदीश शेट्टर यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


ही बातमी वाचा: