नवी दिल्ली : जवळपास दीड वर्ष पूर्णवेळ अध्यक्ष नसलेल्या काँग्रेसमध्ये अखेर बदलांची हालचाल सुरु झाली आहे. एकीकडे पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांना सोनिया गांधी भेटणार आहेत तर दुसरीकडे अहमद पटेल यांची जागा कोण घेणार याचा शोध सुरु झाला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.
अहमद पटेल यांची जागा घेणं म्हणजे एकावेळी पक्ष आणि तिजोरी सांभाळणं, हायकमांड आणि पक्षातला दुवा बनणं. कमलनाथ हे संजय गांधी यांचे सहकारी, तेव्हापासून ते गांधी घराण्याच्या विश्वासू वर्तुळातले राहिले आहेत. शिवाय उद्योगाची पार्श्वभूमी असल्यानं पक्षाला आवश्यक असलेले फंड ते आणू शकतील असा कयास आहे. गहलोत यांच्याही नावाची यासाठी चर्चा सुरु आहे.
अहमद पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. कारण काँग्रेसमध्ये नव्या आणि जुन्या पिढीतला समतोल साधण्याचं काम ते करत होते. शिवाय हायकमांडला संघटनेच्या अंतर्गत बित्तंबातमी त्यांच्याच माध्यमातून पोहचत होती. आता कमलनाथ यांच्या नावाची चर्चा झाली तेव्हा कमलनाथ यांनी मात्र निवृत्तीबद्दलचं एक विधान केलं. तर गहलोत यांच्या दिल्लीवारीनं ही जागा नेमकी कोण घेणार याबाबत तर्कवितर्क सुरु झाले आहेत.
एकीकडे काँग्रेसमध्ये पत्र लिहिणारे 23 नेते शनिवारी सोनिया गांधींना भेटणार आहेत. आॅगस्ट महिन्यात या नेत्यांनी पत्र लिहून पक्षाच्या अवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली होती. या बैठकीचं सर्वात मोठं वैशिष्टय म्हणजे पहिल्यांदाच या नेत्यांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल. कारण या नेत्यांचं पत्र लीक झाल्यानंतर काँग्रेस पक्षाची एक बैठक झाली होती. मात्र त्यात बाकीच्या नेत्यांनी टीकेचा भडीमार केल्यानं तेव्हा त्यांच्या पत्राच्या आशयावर चर्चाच होऊ शकली नव्हती.
महाराष्ट्रातले मुकूल वासनिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा या पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये समावेश होता. उद्या सकाळी 10 वाजता दिल्लीत सोनिया गांधी या 23 नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यातून काय मंथन समोर येतं. पक्षाच्या पुढच्या वाटचालीबद्दल त्यांना काय विश्वास दिला जातो हे पाहावं लागेल.