Kalicharan Maharaj Arrested : महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजला अटक करण्यात आली आहे. कालीचरण महाराजाविरोधात छत्तीसगड, महाराष्ट्रात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील बगेश्वरी धाम येथून पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये कालीचरण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई झाली.
काही दिवसांपूर्वी रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण याने महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गोडवे गायले होते. या वक्तव्यावरून कालीचरणविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतरही त्याने आपले वादग्रस्त वक्तव्य करणे सुरूच ठेवले होते. कालीचरणविरोधात रायपूर, अकोला आणि पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून छत्तीसगड पोलिसांकडून कालीचरण महाराजाचा शोध सुरू होता. त्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही छत्तीसगड पोलिसांनी शोध घेतला होता. त्यानंतर खजुराहो येथील बागेश्वर धाम येथील एका घरातून कालीचरणला अटक करण्यात आली. या कारवाईबाबत छत्तीसगड पोलिसांनी गुप्तता बाळगली असल्याचे सुत्रांनी सांगितले.
छत्तीसगड पोलिसांनी कालीचरण महाराजविरोधात कारवाई करताना मध्य प्रदेश पोलिसांना कोणतीही माहिती दिली नव्हती. छत्तीसगड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कालीचरण महाराजने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वास्तव्याची ठिकाणे बदलत होता. अखेर खजुराहोजवळील बगेश्वरी धाम येथील एका घरातून त्याला अटक करण्यात आली. हे घर त्याने भाडे तत्वावर घेतले होते.
कोण आहे कालीचरण महाराज
'कालीचरण महाराज' अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये 'भावसार पंचबंगला' भागात राहतात. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजांची मोठी क्रेझ आहे. मात्र, कालीचरण महाराज आपल्या भूतकाळाविषयी फारसं काही कुणाला सांगत नाहीत. त्यांचे मूळ नाव 'अभिजीत धनंजय सराग' असं आहे. लहानपणी अभिजीत अत्यंत खोडकर होता. शिक्षणाचे आणि अभिजितचे सख्य फारसं जमले नाही. त्याला शाळेतही जाण्याचा कंटाळा यायचा. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक होता. त्यातही तो कालीमातेची आराधना करायचा. घरच्या मंडळींना तो शिकावा आणि काहीतरी वेगळं काम करावे असे वाटायचे. मात्र, या परिस्थितीतही त्याचा अध्यात्मावरचा विश्वास आणि ओढा वाढत गेला. पुढे अभिजीतचा 'कालीपुत्र कालीचरण' झाला. पुढे लोकांनी त्यांना 'महाराज' असे संबोधने सुरू केले. या कालिचरण महाराजाने 2017 मध्ये अकोला महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, पराभवाचे तोंड पाहावे लागले.
महाराष्ट्रात गुन्हा दाखल
कालीचरण महाराजचा अटकपूर्व जामीन अर्ज अकोला न्यायलयाने फेटाळला होता. त्यामुळे त्याच्या अडचणीत भर पडली होती. सोमवारी अकोल्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कालीचरण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दिला होता. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास इन्कार केल्याने पदाधिकाऱ्यांनी ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केलं होतं. अखेर साडेचार तासांनंतर पोलिसांनी या अर्जाची दखल घेऊन कालीचरण याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. त्याशिवाय बुधवारी, पुणे पोलिसांनीदेखील कालीचरण आणि मिलिंद एकबोटेविरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विधानसभेत कालीचरणवर कारवाईची मागणी :
रायपूर येथील धर्मसभेत कालीचरण महाराजाने केलेल्या वक्तव्याबाबत राज्यमंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. कालीचरण महाराजाविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी नवाब मलिक यांनी केली होती. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही कालीचरणवर कारवाईचा आग्रह सरकारकडे धरला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड यांनीही विधानसभेत कालीचरण महाराजांवर कारवाईची मागणी केली होती. सरकारची बाजू मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते.
कालिचरण महाराजांबद्दल संक्षिप्त माहिती :
1) कालीचरण महाराजाचं मूळ नाव अभिजीत धनंजय सराग.
2) अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर भागातील भावसार पंच बंगल्याजवळ वास्तव्य.
3) आठव्या वर्गापर्यंत शिक्षण. अध्यात्माकडील ओढ्यामुळे शिक्षण सोडलं. हरिद्वारला जात दिक्षा घेतली.
4) कालिभक्त म्हणून कालिचरण महाराज नाव धारण केलं. दोन वर्षांपुर्वी शिवतांडव स्तोत्र व्हिडीओमूळे देशभरात लोकप्रिय. कट्टर हिंदूत्ववादाचा पुरस्कर्ता.
5) 2017 मध्ये अकोला महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत.