रोहित वेमुला प्रकरणावर भाजप बॅकफूट वर गेल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून हे कथित राष्ट्रवादाचा मुलामा देणारं प्रकरण रचलं गेल्याचा दावा गोरियाने केला आहे. 9 फेब्रुवारी 2016 ला जेएनयूत हे प्रकरण घडलं. त्यावेळी मी अभाविपच्या यूनिटचा उपाध्यक्ष तर प्रणव नरवाल हा सहसचिव होता. आम्ही दोघेही अनुसूचित जातीतील विद्यार्थी. रोहित वेमुला प्रकरणात आमच्या मागासवर्गीय असण्याच्या इमेजचा वापर करुन संघटनेचा बचाव करण्यासाठीही दबाव टाकला जात असल्याचं गोरियाने म्हटलं आहे.
तर अभाविपचा माजी सहसचिव आणि या संपूर्ण प्रकरणातला एक तक्रारदार सौरभ शर्मा याने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. हे दोघेही आता काँग्रेसच्या गोटात शिरुन राहुल गांधींच्या इशाऱ्यावरच अभाविपवर हा षडयंत्राचा आरोप करत असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
जेएनयू कथित देशविरोधी घोषणा प्रकरणी तीन वर्षानंतर कन्हैय्याकुमार आणि उमर खालिदसह 10 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचं कलम लावण्यात आलं आहे. तब्बल 1250 पानांचं आरोपपत्र तयार करण्यात आलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण पुन्हा तापवल्याचा आरोप होत आहे.
कन्हैया कुमार 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार!
संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरुला फाशीची शिक्षा दिली. त्याचा निषेध म्हणून त्या दिवशी जेएनयूत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचे पडसाद देशाच्या संसदेतही उमटले होते. कन्हैया कुमार आता बिहारच्या बेगुसरायमधून डाव्या पक्षांच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे.