Jharkhand Protest: झारखंडमधील जेपीएससी आणि जेएसएससी (JPSC-JSSC Exam Scam) परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात गेले 24 दिवस सुरू असलेले विद्यार्थ्यांचे ऐतिहासिक आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन (CM Hemant Soren) यांनी जेएसएससी-सीजीएल (JSSC-CGL) आणि टीडीपीएल (TDPL) एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. यासोबतच 2014 पासूनच्या सर्व परीक्षांची सीआयडी चौकशी (CID Inquiry) करण्याचे आदेश दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले उपोषण आणि आंदोलन मागे घेतले आहे.

Continues below advertisement

Jharkhand Protest: 24 दिवसांचा लढा आणि 6 निष्फळ फेऱ्या

रांची येथील जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर (Jaipal Singh Munda Stadium) गेल्या 24 दिवसांपासून विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात 6 विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले होते. 14 व्या जेपीएससी परीक्षेची रद्दता, गैरव्यवहाराची सीबीआय (CBI) चौकशी आणि जेएसएससी-सीजीएल परीक्षा रद्द करावी, या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थी ठाम होते. यापूर्वी सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चेच्या सहा फेऱ्या झाल्या, मात्र त्या सर्व निष्फळ ठरल्या होत्या.

Jharkhand Protest: भाजपचे राजकारण अन् 'इंडिया' आघाडीची कोंडी

या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाने (BJP) सुरुवातीपासूनच पाठिंबा देत झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस (JMM-Congress) आघाडी सरकारला घेरले. विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनी सीबीआय चौकशीची मागणी उचलून धरली, तर भाजप आमदार नवीन जैस्वाल यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन नैतिक पाठिंबा दर्शवला. विद्यार्थ्यांनीही काँग्रेसने पाठिंबा काढून घ्यावा, अशी मागणी केल्याने स्थानिक पातळीवर 'इंडिया' आघाडीची (INDIA Alliance) मोठी कोंडी झाली होती.

Continues below advertisement

Jharkhand Protest: राहुल गांधींचे पत्र अन् टर्निंग पॉईंट

रविवारी संतप्त आंदोलकांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि तेजस्वी यादव यांचे पुतळे जाळले होते. काँग्रेसच्या मौनाविरोधात विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना लिहिलेले पत्र सोमवारी समोर आले. या पत्रात राहुल गांधी यांनी सोरेन यांना आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले होते. या पत्रानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सरकारवर तोडगा काढण्यासाठी दबाव वाढवला.

Jharkhand Protest: अखेर मध्यरात्री निघाला तोडगा

सोमवारी सरकारने सातव्यांदा चर्चेसाठी आंदोलकांना बोलावले. अखेर रात्री उशिरा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विवादित परीक्षा रद्द करत सीआयडी चौकशीची अधिकृत घोषणा केली. मंत्री दीपिका पांडे सिंह आणि मंत्री इरफान अन्सारी यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची समजूत काढली. यानंतर उपोषणकर्ते देवेंद्रनाथ महतो, उम्मे हबीबा आणि राहुल क्रांती यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले आणि विद्यार्थ्यांनी सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Shiv Sena Symbol Case : शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे सगळे आमदार अपात्रच, ठाकरेंच्या वकिलांकडून दहाव्या अनुसूचीचा दाखला, राहुल नार्वेकरांनाही आरसा दाखवला