Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Jantar Mantar protest Delhi Police: दिल्लीसह जयपूर, केरळ, महाराष्ट्र अशा सर्व ठिकाणी निवडणूक आयोग आणि मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निदर्शने केली जात आहेत.

Jantar Mantar Protest Delhi Police: सध्या देशभरात विद्यार्थी आंदोलनाचा वणवा पेटला आहे. महाराष्ट्र, केरळ, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांकडून सरकारविरोधी आंदोलनं केली जात आहेत. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतर येथे आंदोलन सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी इंडिया गेट ते जंतर मंतर (Jantar Mantar) मोर्चा काढण्यात आला होता. कोणताही मोठा नेता नसताना रविवारी जंतर मंतरच्या परिसरात प्रचंड मोठे आंदोलन पाहायला मिळाले. अशातच दिल्ली पोलिसांच्या हडेलहप्पी आणि अतिआक्रमक धोरणामुळे जंतर मंतरवरील हे विद्यार्थी आंदोलन अधिकच पेटले. या परिसरात विद्यार्थ्यांना अडवायला बॅरिकेटस, प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र, या सगळ्याला न जुमानता विद्यार्थ्यांनी दिल्ली पोलिसांनी अक्षरश: रडकुंडीला आणल्याचे दिसून आले. (Delhi Protest)
याठिकाणी दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरच्या परिसरातील आंदोलनाने मोठे स्वरुप धारण करु नये, यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले. पोलिसांनी याठिकाणी विद्यार्थी आणि आंदोलकांना पकडायला अनेक मोठ्या बस आणल्या होत्या. मात्र, काही विद्यार्थ्यांनी या बस आणि इतर वाहनांच्या चाव्या पळवून नेल्या. त्यामुळे ही वाहने एकाच जागी थांबून होती. दिल्ली पोलीस आंदोलकांना पकडून काही बसमध्ये कोंबत होते तेव्हा इतर विद्यार्थ्यांनी बसच्या टायरमधील हवा काढून टाकली. जेणेकरुन या बसेस पुढे जाणार नाहीत. तर काही विद्यार्थ्यांनी त्यांना पकडून बसमध्ये टाकल्यानंतर बसचे इमर्जन्सी एक्झिट उघडून चालच्या बसमधून बाहेर उड्या टाकल्या. तर काही विद्यार्थ्यांनी बसच्या काचा फोडून ते त्यामधून बाहेर पडले. या सगळ्या विद्यार्थ्यांना अडवताना दिल्ली पोलीस अक्षरश: रडकुंडीला आले होते.
याशिवाय, अखिल भारतीय छात्र संघटनेकडून (AISA) रविवारी जंतर मंतरच्या परिसरात आक्रमक आंदोलन करण्यात आले. AISA ची राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा (Neha Bora) हिची दिल्ली पोलिसांशी झटापट झाली. नेहा बोरा आणि आयसाच्या इतर कार्यकर्त्यांना पकडताना दिल्ली पोलिसांनी जबरदस्त बळाचा वापर केला. तरीही हे विद्यार्थी मागे हटायला तयार नव्हते. दिल्ली पोलिसांनी नेहा बोरा हिला ताब्यात घेतल्यानंतर एका खासगी गाडीतून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विद्यार्थ्यांनी या कारला घेराव घालून रस्ता अडवला. काही विद्यार्थ्यांनी या कारची हवा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्ली पोलिसांचे एक पथक या कारच्या भोवती वेढा देऊन उभे राहिले होते आणि आंदोलकांना नेहा बोरा हिच्यापर्यंत पोहोचून देत नव्हते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी नेहा बोरा हिला लांब अंतरावर नेऊन सोडले. तिच्याजवळचा फोन आणि बॅगही काढून घेण्यात आली होती. या सगळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Delhi Police: दिल्ली पोलिसांकडून महिला पत्रकाराचा विनयभंग?
दिल्ली पोलिसांकडून ज्याप्रकारे आंदोलनाची हाताळणी होत आहे, त्यावर प्रचंड टीका केली जात आहे. दिल्ली पोलिसांनी अखिल भारतीय छात्र संघटनेची राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा हिला अंतर्वस्त्राला धरुन खेचले होते. तसेच एका बड्या पोलीस अधिकाऱ्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंगही करण्यात आल्याचा आरोप आहे. नेहा बोरा हिला ताब्यात घेताना पत्रकारांकडून त्याचे वार्तांकन सुरु होते. त्यावेळी एसीपी विवेक भगत यांनी महिला पत्रकाराच्या छातीवर हात मारला होता आणि तिला धक्का देऊन ते निघून गेले. त्यामुळे दिल्लीच्या संसद मार्गावरील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रकार आणि आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, पोलिसांनी हा परिसर बॅरिकेटस लावून बंदिस्त केला होता. तसेच याठिकाणी प्रचंड मोठा फौजफाटा तैनात होता. त्यामुळे या परिसराला एखाद्या लष्करी छावणीचे स्वरुप आले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यादेखील पोलीस ठाण्यात आल्या होत्या. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात त्यांच्या तक्रारीच्याआधारे लगेच गुन्हा दाखल करावा, असा कायदा आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी महिलांवरील लैंगिक शोषणाच्या विरोधातील कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याच्या चिंधड्या उडवल्या आहेत, असे वृंदा करात यांनी म्हटले.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
आणखी वाचा
Before You Go
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली





















