Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने सोमवारी उग्र स्वरुप धारण केले होते. कॉकरोच जनता पार्टीने (CJP) संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली होती. त्यासाठी संसदेच्या दिशेने निघालेल्या आणि जंतरमंतरवरील (Jantar Mantar Protest) आंदोलकांवर दिल्ली पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांनी बेछूट लाठीमार केला होता. हा लाठीमार करताना पोलिसांनी कोणतीही तमा बाळगली नाही. आंदोलकांची डोकी, छाती, पाठ मिळेल तिकडे पोलीस बिनधास्तपणे लाठ्या मारताना दिसत होते. या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले असून त्यापैकी एका तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. (Delhi protest news)
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांच्या लाठीमारात एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर राममनोहर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. केंद्र सरकार तरुणांशी इतक्या अमानुषपणे का वागत आहे, असा सवाल अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला. काल दुपारी पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतरवरुन हटवले होते. मात्र, आज सकाळपासून आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर जमू लागले आहेत. त्यांनी स्टेज पुन्हा उभारला असून पुन्हा आंदोलन सुरु केले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांची एक महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत आंदोलक आणि पोलिसांमधील झटापट आणि सुरक्षाव्यवस्थेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचं आमरण उपोषण सुरुच राहणार
सोनम वांगचुक यांनी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातून एक हस्तलिखित संदेश सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पत्रात त्यांनी शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या कारवाईचा निषेध करत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सोनम वांगचुक यांचा हस्तलिखित संदेश व्हायरल झाला आहे.
दरम्यान सोनम वांगचुक यांना चांगल्या उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात ठेवावे की खासगी रुग्णालयात हलवावे, याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालय आज घेणार आहे. सोनम यांना खासगी रुग्णालयात हलवण्याच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. ही याचिका सोनम यांची पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केली आहे. उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सोमवारी या याचिकेवरील सुनावणी संपली. आज दुपारी 12.30 वाजता सुनावणी पुन्हा सुरू होईल.
Cockroach janata party: केंद्र सरकार आणि आंदोलकांमध्ये चर्चा
सीजेपीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर तब्बल 30 दिवसांनी अखेर सरकारने चर्चेची दारे उघडलीत. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावलं होतं. पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी यावेळी सरकारकडे 3 प्रमुख मागण्यांचं निवेदन दिलं. सोनम वांगचुक यांना त्वरीत सोडावं, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि NEET मध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत द्यावी, या तीन मागण्या सीजेपीकडून करण्यात आल्यात. दरम्यान नड्डा यांनी आंदोलन थांबवून चर्चेच्या मार्गाने तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे.
आणखी वाचा
