NaMo App Jan Man Survey : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला 11 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विविध मुद्द्यांवर लोकांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी नमो अ‍ॅपवर एक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाला एका दिवसात पाच लाखांहून अधिक प्रतिसाद मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सर्वेक्षण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर देखील शेअर केले आहे. 

या सर्वेक्षणात 77 टक्के लोकांनी प्रतिसाद देत आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यावरून या 'राष्ट्रीय संवादात' योगदान देण्यास लोकांचा सहभाग आणि रस दिसून येतो. सर्वाधिक प्रतिसाद उत्तर प्रदेशातून मिळाला असून त्यानंतर महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि हरियाणा या ठिकाणीही मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं.

NaMo App Jan Man Survey : कोणत्या राज्यातून किती प्रतिसाद?

भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशातून 1,41, 150 हून अधिक लोकांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर महाराष्ट्रातून 65,775, तामिळनाडूतून 62,580, गुजरातमधून43,590 आणि हरियाणामधून 29,958 लोकांनी प्रतिसाद दिला. हे अनोखे सर्वेक्षण लोकांना लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी करून घेण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांना प्रमुख राष्ट्रीय मुद्द्यांवर आणि सरकारी उपक्रमांवर त्यांचे मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळतो.

मोदींनी 10 जून रोजी जनमन सर्वेक्षणाची घोषणा केली. याच दिवशी 2024 मध्ये, त्यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी पदाची शपथ घेतली. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे अभिप्राय आणि मतं थेट सरकारशी शेअर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळते. भविष्यातील धोरणे तयार करताना लोकांचे मत जाणून घेतले जातील आणि त्यावर विचार केला जाईल असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं. 

 

Jan Man Survey : सर्वेक्षणात कोणते प्रश्न विचारले गेले?

या सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये गेल्या दशकात दहशतवादाविरुद्ध भारताच्या दृष्टिकोनातील उत्क्रांतीबद्दल अभिप्राय मागितला गेला होता. राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्यांविरुद्ध सरकारने केलेल्या कारवाईमुळे नागरिक म्हणून तुम्हाला किती सुरक्षित वाटते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा आवाज ऐकला जात आहे आणि त्याचा आदर केला जात आहे असे तुम्हाला वाटते का, इत्यादी प्रश्नांचा समावेश होता. तसेच स्किल इंडिया, मेक इन इंडिया आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास प्रयत्नांसारख्या सरकारच्या ओळखल्या जाणाऱ्या काही उपक्रमांवर अभिप्राय मागितला गेला होता.