Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) सरकारने राज्यात कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी वैष्णो देवी मंदिरातून (Vaishno Devi Temple) येणाऱ्या यात्रेकरूंसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. आरोग्य मंत्रालयाने कोरोनाशी संबंधित निर्बंध शिथिल केल्याने, शेकडो लोक जम्मू -काश्मीरच्या वैष्णो देवी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. हे पाहता राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना (Covid Guideline) जारी केली आहे. आदेशात म्हटले आहे की वैष्णो देवीला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी 'वैध आणि वेरिफाइड RT-PCR किंवा जलद अँटीजन चाचणी अहवाल अनिवार्य आहे. हा चाचणी अहवाल राज्यातील प्रवाशांच्या आगमनानंतर 72 तासांपेक्षा जुना नसावा.


आदेशात म्हटले आहे की, वैष्णो देवीला भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांना नवीन कोविड प्रोटोकॉलचे (Covid Protocol) काटेकोरपणे पालन करावे लागेल. नियमांनुसार, फक्त त्या प्रवाशांनाच देवीच्या दर्शनाचे सौभाग्य मिळेल, ज्यांना कोविड संसर्गाची कोणतीही लक्षणे नसतील. याशिवाय स्वच्छतेसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वामध्येही कडक नियम करण्यात आले आहेत. आदेशानुसार, प्रशासनाने मंदिराच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि वेळोवेळी बसण्याची जागा स्वच्छ केली पाहिजे.




जम्मू -काश्मीरमध्ये कोरोनाची 87 नवीन प्रकरणे
दुसरीकडे, राज्यात कोरोनाच्या प्रकरणांमध्येही घट झाली आहे. अहवालानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी कोविड -19 चे 87 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. नवीन प्रकरणांसह संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 3,31,386 झाली आहे. त्याचबरोबर, अहवालानुसार, गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की केंद्रशासित प्रदेशात या विषाणूमुळे आतापर्यंत एकूण 4,429 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन प्रकरणांमध्ये 13 प्रकरणे जम्मूमधून तर 74 नवीन प्रकरणे काश्मीर विभागात नोंदवण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की जम्मू -काश्मीरमध्ये सध्या 814 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 3,26,143 रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत.


देशात कोरोनाचे 1.75 लाख सक्रिय रुग्ण
दरम्यान देशात सध्या 1.75 लाख सक्रिय कोरोना रुग्णांची नोंदणी झाली आहे. त्याचवेळी 15,786 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. तर या विषाणूमुळे 231 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांमध्ये 18,641 लोक संसर्गातून बरे झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत कोरोनामधून बरे झालेल्या लोकांची संख्या भारतात 3,35,14,449 झाली आहे. आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1,75,745 वर आली आहे.