जलीकट्टूवरील बंदीविरोधात चेन्नईच्या मरीना बीचवर जनक्षोभ
एबीपी माझा वेब टीम | 18 Jan 2017 11:40 PM (IST)
चेन्नई: जलीकट्टूवर सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीविरोधात तामिळनाडूमध्ये कालपासून जनक्षोभ उसळला आहे. तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाचे लोण मदुराई, चेन्नई, सालेम आणि कोईम्बतूर या भागांमध्ये पसरलं आहे. पोंगल सणाच्या दुसऱ्या दिवशी मदुराई येथून सुरू झालेल्या या राज्यव्यापी आंदोलनाच्यावेळी पोलिसांनी २०० आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन आणखीनच चिघळलं आहे. आज सकाळपासून चेन्नई येथील मरीना बीचवर जलीकट्टूच्या समर्थनार्थ लोक मोठ्या संख्येनं जमले आहेत. हा प्रचंड जनसमुदाय पाहता या आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने जलीकट्टूवर घातलेली बंदी उठवावी अशी आंदोलकांची मागणी आहे.