नवी दिल्ली : देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिल्याने देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी तब्येतीच्या कारणाचा हवाला देत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला असला तरी, या निर्णयामागे राजकीय वाद असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील विरोधकांचा महाभियोगाचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला. त्यानंतर सरकारकडून त्यांना आलेला कॉल आला आणि त्यावेळी वाद झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
‘एक कॉल’ आणि वाद
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून धनखड यांना एक फोन कॉल आला आणि त्यानंतर वादविवादाला सुरुवात झाली. या कॉलनंतर धनखड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मान्सून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (21 जुलै) विरोधकांनी न्यायमूर्ती वर्मा यांना हटवण्याविरोधात प्रस्ताव सादर केला होता. धनखड यांनी ती नोटीस स्वीकारली आणि संसद सचिवालयाला कारवाईचे आदेश दिले. यामुळे केंद्र सरकार त्यांच्यावर नाराज झाले, असेही सूत्रांनी सांगितले.
फोनवर वाद आणि ‘अविश्वास’ चर्चा
फोनवरील संभाषणात धनखड यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आणि चर्चेचे स्वरूप वादात बदलले असं सूत्रांनी सांगितलं. इतकेच नव्हे तर, त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या चर्चा सुरू झाल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. ही माहिती मिळताच धनखड यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.
राजीनामा राजकीय दबावामुळे?
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी जगदीप धनखड यांचा राजीनामा संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, कार्य मंत्रणा समितीच्या (BAC) बैठकीसाठी मंत्री जे. पी. नड्डा आणि किरेन रिजिजू गैरहजर होते. ही माहिती धनखड यांना आधीच दिली गेली नव्हती, त्यामुळे त्यांना दुख झाला, असा दावा जयराम रमेश यांनी केला.
धनखड यांचे गावही अवाक
हरियाणातील जयदीप धनखड यांच्या गावात राजीनाम्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांच्या नातलगांनी सांगितले की, त्यांची तब्येत खरोखरच काही काळापासून ठीक नव्हती. मार्चमध्ये त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती, तसेच उत्तराखंडच्या दौऱ्यातही तब्येत बिघडली होती. त्यांच्या नातलग हरेंद्र धनखड यांनी सांगितले की, त्यांनी शाळा आणि गोशाळेकरिता मोठे योगदान दिले आहे.
गावच्या सरपंच सुभिता धनखड म्हणाल्या की, "धनखड हे अजूनही मोठ्या पदावर पोहोचतील." दुसऱ्या एका ग्रामस्थाने म्हटले, "त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणे आवश्यक होते. हा राजीनामा गावासाठी आणि राजस्थानसाठी दुःखद आहे."
ही बातमी वाचा: