श्रीहरिकोटा : आदित्य एल1 (Aditya L1) चे यशस्वी प्रक्षेपण झाले असल्याची घोषणा इस्रो (ISRO) प्रमुख एस. सोमनाथ यांनी केली आहे. त्यांनी यावेळी इस्रोच्या शास्रज्ञांचे देखील अभिनंदन केले आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य एल1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. त्यामुळे आता इस्रोला सूर्याचा अभ्यास करणं हे शक्य होणार आहे. 


काय म्हणाले इस्रो प्रमुख?


प्रक्षेपणाचे महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाल्यानंतर इस्रोच्या प्रमुखांनी याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी म्हटलं की, "आदित्य एल 1 ला त्याच्या योग्य कक्षेत प्रस्थापित करण्यात आले आहे. पीएसएलव्ही रॉकेटने अगदी योग्य पद्धतीने या यानाला त्याच्या योग्य कक्षेत पोहोचवले आहे. तसेच भारताने आता लॅग्रेंज पाईंट 1 च्या दिशेने यशस्वी प्रवास सुरु केला आहे." दरम्यान याच संदर्भात इस्रोने ट्वीट करत देखील माहिती दिली आहे. 


यावेळी इस्रो प्रमुखांनी पीएसएलव्हीचे देखील आभार मानले आहेत. भारताच्या एका महत्त्वाच्या मोहिमेत पीएसएलव्हीने केलेल्या सहकार्याबद्दल देखील इस्रो प्रमुखांनी आभार व्यक्त केले आहे. आता आपण या यानाला त्याच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देऊया, असं देखील इस्रो प्रमुखांनी म्हटलं आहे. 






हा अत्यंत अभिमानाचा क्षण : मंत्री जितेंद्र सिंह 


या प्रक्षेपणाच्या वेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह देखील उपस्थित होते. त्यांनी इस्रोच्या शास्रज्ञांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींचे देखील आभार मानले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, आता संपूर्ण जग हा भारताचा सूर्याच्या दिशेने प्रवास पाहणार आहे. 


शास्रज्ञांनी काय म्हटलं? 


यावेळी या मोहीमेसाठी मेहनत घेतलेले शास्रज्ञ देखील उपस्थित होते. त्यांनी देखील यावर बोलताना या मोहिमेचं कौतुक केलं आहे. पीएसएलव्ही रॉकेटविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या मोहिमेसाठी लागणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी या अनेक संस्थांनी अगदी वेळेवर पुरवल्या. त्यामुळे त्यांचे देखील आभार, असं यावेळी इस्रोच्या शास्रज्ञांनी म्हटलं आहे. दरम्यान या महत्त्वाच्या मोहिमेचा भाग करुन घेतल्याबद्दल शास्रज्ञांनी इस्रोचे आभार मानले आहेत. या संपूर्ण प्रवासात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असं देखील या शास्रज्ञांनी म्हटलं आहे. 


हेही वाचा : 


Aditya-L1 Mission : शाब्बास! आदित्य एल1 चे प्रक्षेपण, भारताचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु