Israel-Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी (Israel Hamas War) युद्ध सरु झालं आहे. यादरम्यान, इतर देशांमध्ये लोक यामध्ये अडकले गेले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री नुरसत भरुचाही इस्रायलमध्ये अडकली होती, मात्र ती रविवारी भारतात सुखरुप परतली आहे. भारताचे 27 नागरिक इस्रायलमध्ये अडकले असून यामध्ये एका खासदाराचाही समावेश आहे. हे सर्व जण मेघालयमधील असल्याची माहिती आहे. इस्रायलमध्ये अडकलेल्या आता या 27 भारतीयांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 


मेघालयमधील 27 जण इस्रायलमध्ये अडकले


मेघालयमधील 27 लोक इस्रायलमध्ये अडकल्याची माहिती आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व भारतीय सुखरुप असल्याचं म्हटलं आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी सांगितलं की, सर्व 27 जण सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळाली आहे.






27 भारतीय सुखरुप


मेघालयचे मुख्यमंत्री संगमा यांनी ट्विटर पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''ताज्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालय आणि आमच्या भारतीय मिशनच्या प्रयत्नांतून, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष क्षेत्रात अडकलेल्या मेघालयातील आमच्या 27 नागरिकांनी सीमा ओलांडली आहे. ते आता इजिप्तमध्ये आहेत.''


इस्रायल आणि पॅलेस्टिनीमधील संघर्ष तीव्र


6 ऑक्टोबरला पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर 5000 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यामुळे इस्रायलचे मोठे नुकसान झालं आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध घोषित केलं आहे. या संघर्षामध्ये आतापर्यंत इस्रायली आणि पॅलेस्टिनी मिळून एकूण 1100 जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत. हमास आणि इस्रायलकडून एकमेकांवर हल्ले सुरुच आहेत.


हमासच्या लष्करी शाखेच्या कमांडर-इन-चीफचा मृत्यू


हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल लष्कराकडून सातत्याने हल्ले सुरु आहेत. इस्रायल लष्कराने जोरदार हल्ला करत हमासच्या लष्करी शाखा अल-नासेर सलाह अल-दिन ब्रिगेडचा कमांडर-इन-चीफ रफत अबू हिलाल अबू अल-अब्दला ठार मारलं आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यादरम्यान गाझामधील रफाह येथील घरावर झालेल्या बॉम्बस्फोटात त्याचा मृत्यू झाला आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


Israel-Palestine Conflict : इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षात 1100 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक इस्रायली हमासकडे ओलिस