Petrol Price : इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम कच्च्या तेलावर; भारतात पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका उडणार?
Petrol Diesel Price India : इराणने इस्त्रायलवर मिसाईल हल्ला केल्यानंतर एकाच दिवसात आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत 5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मुंबई : पश्चिम आशियात इस्त्रायल-इराणमध्ये भडकलेल्या युद्धाचा परिणाम भारतासह जगभरात दिसण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाच दिवसात कच्च्या तेलाच्या किमतीत 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. हे युद्ध जसे वाढत जाईल तसे कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा फटका भारताला बसणार असून पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका उडण्याची शक्यता आहे.
इस्त्रायलचे लेबनॉनवरील हल्ले आणि त्यानंतर हिजबुल्लाह संघटनेच्या प्रमुखाची हत्या केल्यानंतर इराणने या युद्धात उडी घेतली आहे. मंगळवारी रात्री इराणने सुमारे 180 हून अधिक मिसाईल्स इस्त्रायलवर डागले. त्याला जर इस्त्रायलने प्रत्युत्तर दिलं तर आणखी विनाशकारी हल्ला करण्याची धमकीही दिली आहे. त्यामुळे इराण आणि इस्त्रायलच्या युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
एकाच दिवसात 5 टक्क्यांनी किंमत वाढली
पश्चिम आशियातील या घटनेचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार असून मोठ्या आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. बुधवारी एकाच दिवसात कच्च्या तेलाच्या किमतील 5 टक्क्यांची वाढ झाल्याने तसे संकेत मिळत आहेत. इराण हा कच्च्या तेलाचा जगातील एक प्रमुख निर्यातदार देश आहे. भारतामध्ये आयात करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलामध्ये इराणचा वाटा मोठा आहे.
इराणचा इस्त्रायलवर हल्ला
लेबनॉनमधील इस्रायलचे हल्ले, हिजबुल्लाहच्या प्रमुखाची हत्या, यांचा बदला घेण्यासाठी इराणने इस्रायलवर मंगळवारी रात्री जोरदार हल्ले केले. इराणने हायपरसॉनिक फताह हे क्षेपणास्त्र डागलं असा दावा इराणच्या रेव्होल्युशनरी फोर्सेसनी केला. यातल्या 90 टक्के क्षेपणास्त्रांनी लक्ष्यवेध केला असा दावा रेव्होल्युशनरी फोर्सेसनी केला. धक्कादायक म्हणजे मोसादच्या मुख्यालयापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर ही क्षेपणास्त्र पडली असा दावा करण्यात येतो. तर आयडीएफच्या प्रशासकीय कार्यालयापासून 500 मीटरवर क्षेपणास्त्र पडली.
तर इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलची क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा तातडीने कार्यान्वित झाली असा दावा इस्रायलने केला. दुसरीकडे इस्रायलच्या मदतीला अमेरिका धावून आल्याचं दिसतंय. इराणची क्षेपणास्त्र हवेत झेपावल्यावर तातडीने अमेरिकेच्या युद्धनौकेवरून इंटरसेप्टर मिसाईल्स हवेत झेपावली. साधारणपणे एक डझन इंटरसेप्टर्स अमेरिकेच्या युद्धनौकेवरून सोडण्यात आली.
या घडामोडींनंतर इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरूतवर पुन्हा एकदा जोरदार मारा केला. त्यामुळे इस्रायल-लेबनॉन-इराण हा संघर्ष थांबवण्याचं नाव घेत नाही. याच मोठा आर्थिक परिणाम जगाला भोगावा लागणार आहे. पेट्रोलियमचे दर 5 टक्क्यांहून अधिक कडाडले आहेत.
ही बातमी वाचा :