मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं निधन झालं. वयाच्या 54 व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यांला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाचा आजार होता. परंतु काल अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु आज ते मृत्यूशी झुंज हरले. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडसह सर्वत्र शोककळा पसरली आहे. राजकीय क्षेत्रातून देखील त्यांच्या निधनानंतर भावूक प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


चित्रपट तसेच नाट्यसृष्टीचे मोठे नुकसान : नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन इरफानला श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'इरफान खानच्या निधनाने चित्रपट तसेच नाट्यसृष्टीचे मोठे नुकसान झालं आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्याने साकारलेल्या अष्टपैलू भूमिकांसाठी तो कायमच आपल्या लक्षात राहील. माझ्या सद्भावना त्याचे कुटुंब, मित्र परिवार आणि चाहत्यांबरोबर आहेत. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो, असं मोदींनी इरफानला श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं आहे.


अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न : राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी इरफान खान यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. 'इरफान खान यांच्या निधनाची माहिती समजून अतिशय दु:ख वाटलं. इरफान अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न अभिनेता होता. जागतिक स्तरावरील चित्रपटांमध्ये, दूरचित्रवाणीवर त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. ते कायम स्मरणात राहतील. या अतिशय दु:खद प्रसंगात माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासह मित्रपरिवार आणि चाहत्यांसोबत आहेत,' अशा शब्दांत गांधींनी इरफान खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील इरफान खानच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. इरफान खान हे हरहुन्नरी कलाकार होते. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर ग्लोबल फेम प्राप्त केली होती. त्यांच्या रुपाने आपण सिनेसृष्टीतला एक मौल्यवान दागिणा गमावला आहे.


चित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, इरफान खान यांच्यात गुणी अभिनेत्याबरोबरच उत्तम व्यक्तिमत्व सामावले होते. भारतीय चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड हा त्यांचा प्रवास होतकरू कलावंतांना एक वस्तूपाठ ठरेल असाच आहे.दुर्धर असा कॅन्सर झाला असूनही न खचता, सकारात्मकतेने इरफान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरू असतांना परत उत्साहाने उभे राहिले. दुर्दैवाने काळाने त्यांना ओढून नेले आणि अभिनयाचा त्यांचा प्रवास थांबला. त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.

अभिनेते इरफान खान रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील : उपमुख्यमंत्री अजित पवार
अभिनेता इरफान खान यांचं निधन हे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी, कलाजगतासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या अकाली निधनानं एक दमदार अभिनेता, संवेदनशील माणूस, लढाऊ व्यक्तिमत्वं आपण गमावलं आहे. सहजसुलभ अभिनयातून साकारलेल्या विविधांगी व्यक्तिरेखांमुळे इरफान खान कायम रसिकांच्या स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली. अभिनेता म्हणून इरफान खान निश्चितच महान होते. त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका त्यांच्या अष्टपैलू अभिनय कौशल्याची साक्ष देतात. कॅन्सरसारख्या आजारावर मात करुन त्यांनी त्यांच्यातला लढाऊपणा दाखवून दिला होता, परंतु आज अचानक आलेली त्यांच्या निधनाची बातमी ही माझ्यासारख्या असंख्य चित्रपट रसिकांसाठी, त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, असं उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे.


 महान कलावंतास देश मुकला - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देखील इरफान खान यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. जागतिक सिनेमात अभिनयाचा ठसा उमटविणारा अभिनेता इरफान खान यांचे निधन झाले. अतिशय संघर्षातून पुढे आलेल्या या अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटविला होता. त्याच्या निधनामुळे एका महान कलावंतास देश मुकला, असं सुळेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.